वर्धा : विधानसभा निवडणुकीत नियमित नेत्यांसह अन्य काही प्रभावी व्यक्तींवर प्रत्येक पक्ष जबाबदारी देत असतो. त्याने तटस्थपणे मतदारसंघातील उणीवा शोधून त्या भरून काढण्याचे कार्य असे व्यक्ती करतात. भाजपमध्ये दत्ता मेघे व पुत्र सागर मेघे हे असेच प्रभावी व्यक्ती समजल्या जातात. पक्षनेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास राखून असणाऱ्या या नेत्याची भाजप नेहमीच प्रामुख्याने नागपूर व वर्ध्यात मदत घेत असल्याचे म्हटल्या जाते. आता या निवडणुकीत सागर मेघे यांच्यावर समीर मेघे यांचा हिंगणा, डॉ. पंकज भोयर यांचा वर्धा व राजेश बकाने यांच्या देवळी मतदारसंघाची जबाबदारी टाकण्यात आल्याचे जिल्हा नेते सांगतात. पण अद्याप ते हजर न झाल्याने हिंगणा सोडून उर्वरित दोन मतदारसंघात चुळबुळ सुरू झाल्याचे दिसून आले.

याबाबत विचारणा केल्यावर सागर मेघे म्हणाले की, या तीन मतदारसंघाची जबाबदारी पक्षाने सुरुवातीला टाकली होती, हे खरं आहे. पण मग मी हिंगणा येथेच लक्ष केंद्रित करणार असल्याचे कळविले. मात्र, हिंगणघाट व वर्धा मतदारसंघाचा आढावा घेणार. पुढील दोन दिवस हिंगणघाट येथे देणार, नंतर वर्धा. देवळीत अंतिम टप्प्यात कदाचित जाणे होईल.

हेही वाचा :चिखलीत ‘ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार?

वर्धा लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये लढून पराभूत झाल्यावर सागर मेघे यांनी सक्रिय राजकारणास जवळजवळ रामराम ठोकल्याची स्थिती राहिली. मात्र त्यांना परिस्थिती सांगण्यासाठी भाजप नेते त्यांच्या नियमित संपर्कात असतात. उमेदवारी जाहिर होण्यापूर्वी त्यांनी सावंगी येथे एक सभा डॉ. पंकज भोयर यांच्यासाठी घेतली होती. यात सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना बोलावण्यात आले व झाडून बहुतांश हजर पण होते. त्यानंतर बंधू समीर मेघे यांच्या प्रचाराची सूत्रे त्यांनी हाती घेतली आहेत. त्यांच्या नेतृत्वात वैद्यकीय संस्थेखेरीज अन्य विविध संस्था कार्यरत असून दहा हजारावर अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची मदत निवडणुकीत व्हावी किंवा विरोधात काम करू नये यासाठी भाजप उमेदवारांना सागर मेघे हवे असतात. या निवडणुकीत भाजपने जिल्ह्यातील चारही मतदारसंघात विजय खेचण्याचा निर्धार जाहीरपणे व्यक्त केला आहे. त्यात उणीव राहू नये म्हणून घट्ट बांधणी केली आहे. तडे दिसल्यास सागर मेघे व अन्य नेत्यांनी ते बुजवावे असे स्थानिक नेत्यांचा व्यूह आहे.

Story img Loader