चंद्रपूर : कुणबीबहुल वरोरा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्वच उमेदवार नवखे आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अनिल धानोरकर यांनीच केवळ नगर परिषदेची निवडणूक लढविली आहे. काँग्रेसचे प्रवीण काकडे, भाजपचे करण देवतळे, महायुतीचे बंडखोर मुकेश जीवतोडे, अपक्ष डॉ. चेतन खेटेमाटे, प्रहारचे अहतेशाम अली यांचा हा निवडणुकीचा पहिलाच अनुभव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भद्रावती व वरोरा या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या वरोरा मतदारसंघात उद्योगांची संख्या मोठी आहे. माजी मंत्री दिवं. दादासाहेब देवतळे, विधानसभेचे उपसभापती ॲड. मोरेश्वर टेमुर्डे व माजी मंत्री संजय देवतळे यांनी या मतदारसंघाचे आजवर प्रतिनिधीत्व केले आहे. राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष उमेदवार प्रथमच या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २०१९ मध्ये विधानसभेत वरोराचे प्रतिनिधीत्व प्रतिभा धानोरकर यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार, खासदार धानोरकर यांचे ‘लाडके भाऊ’ प्रवीण काकडे यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवली नाही. मात्र, लाडक्या बहिणीने आमदारकी घरातच राहावी म्हणून काकडे यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणली. हीच त्यांची एकमेव जमेची बाजू. भाजप व महायुतीचे उमेदवार करण देवतळे यांनाही निवडणुकीचा अनुभव नाही. केवळ माजी मंत्री संजय देवतळे यांचे सुपुत्र हीच त्यांची योग्यता. याशिवाय त्यांच्याकडेही सांगण्यासारखे दुसरे काही नाही. महायुतीचे बंडखोर मुकेश जीवतोडे यांनाही निवडणुक लढण्याचा अनुभव नाही. खासदारकी व आमदारकी एकाच घरात राहू नये, याला विरोध करीत जीवतोडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली.

हेही वाचा : Nagpur Assembly Constituency : गडकरी-फडणवीस यांच्या संयुक्तप्रचार सभेच्या मुहुर्ताची प्रतीक्षा

या मतदारसंघात एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यातील सर्वांत उच्चविद्याविभूषित उमेदवार म्हणून डॉ. चेतन खुटेमाटे यांची ओळख आहे. स्वत: नेत्रतज्ज्ञ असलेले डॉ. खुटेमाटे यांचा हा निवडणुकीचा पहिलाच अनुभव. वंचितचे अनिल धानोरकर यांची ही पहिलीच विधानसभा निवडणुक. त्यांनी यापूर्वी भद्रावती नगर परिषदेत नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक लढली व जिंकलीदेखील आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते प्रथमच उतरले आहेत. त्यांचे बंधू बाळू धानोरकर खासदार व आमदार होते. वहिणी प्रतिभा धानोरकरदेखील आमदार होत्या व आता खासदार आहेत. मात्र, खासदार धानोरकर यांच्या विरोधातूनच अनिल धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी वंचितच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. प्रहार पक्षाचे अहतेशाम अली यांनीही यापूर्वी वरोरा नगरपरिषदेची निवडणूक लढली व जिंकली. ते वरोराचे माजी नगराध्यक्ष होते. त्यांचाही विधानसभा निवडणुकीचा हा पहिलाच अनुभव आहे.

हेही वाचा : मुंबईतली प्रवास, वीज अदानींमुळे महाग, वंचित’च्या प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

बाळू धानोरकरांच्या नावाने मतांचा जोगवा

काँग्रेस उमेदवार प्रवीण काकडे व वंचितचे अनिल धानोरकर या दोघांच्याही फलक आणि इतर प्रचार साहित्यांवर दिवं. बाळू धानोरकर यांचे छायाचित्र आहे. त्यांचे नाव समोर करून दोघेही मतदारांमध्ये जात आहेत. काकडे हे तर धानोरकर यांचा वारसा, असे सांगून मत मागत आहेत. त्यामुळे अनिल धानोरकर यांच्या मातोश्री धानोरकर कुटुंबाचा वारसा केवळ अनिल धानोरकर आहेत, असे मतदारांना पटवून देत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 warora assembly constituency all candidates contesting for the first time print politics news css