अकोला : ऐन निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये असंतोषाची दरी निर्माण झाली. वाशीम जिल्ह्यात दिग्गजांच्या बंडखोरीमुळे महायुतीत कुरबुरी वाढल्या आहेत. बंडखोरांवरील कारवाईवरून भाजप व शिवसेना शिंदे गटात वादाची ठिणगी पडली. रिसोडमध्ये भाजपतील बंडखोरीमुळे शिवसेना शिंदे गटाने इतर दोन मतदारसंघात वेगळी भूमिका घेण्याचा इशारा दिला. याचा परिणाम निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर पडण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती व मविआमध्ये प्रत्येकी प्रमुख तीन पक्ष एकत्र आल्याने इच्छुकांना मर्यादित संधी मिळाली. निवडणुक लढण्याच्या तीव्र महत्त्वाकांक्षेने अनेकांनी हातात बंडाचा झेंडा घेतला. काहींनी आपल्या बंडाची तलवार म्यानमध्ये टाकली, तर अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. प्रमुख सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले. त्यामुळे मतविभाजन होऊन राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, पक्षांनी कारवाईचा बडगा उगारला.

हेही वाचा : खामगावात आकाश फुंडकर – दिलीप सानंद यांच्यात चुरशीची लढत; गटबाजी, मतविभाजन निर्णायक

वाशीम जिल्ह्यात बंडखोरांवर केलेल्या कारवाईत भाजपने पक्षपातीपणा केल्याचा आरोप शिवसेनेने केला. रिसाेड मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी सामना आहे. माजी राज्यमंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रिसोडमधून अपक्ष निवडणूक लढवत काँग्रेसचे अमित झनक यांना काट्याची लढत दिली होती. त्यात दोन हजार १४१ मतांनी देशमुखांचा पराभव झाला. स्वत:ची आघाडी तयार करून देशमुखांनी जिल्ह्यात प्रभाव कायम ठेवला. त्यानंतर रिसोडमधून उमेदवारी मिळण्याच्या आशेवर अनंतराव देशमुख पुत्रांसह भाजपवासी झाले. मात्र, हा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाला सुटल्याने त्यांची निराशा झाली. अनंतराव देशमुखांनी पुन्हा बंडाचे निशाण हातात घेतले. काँग्रेसचे अमित झनक सलग चौथ्यांदा रिंगणात असून शिवसेना शिंदे गटाकडून भावना गवळी मैदानात आहेत. रिसोडमध्ये अमित झनक, अनंतराव देशमुख व भावना गवळी यांच्यात तिरंगी सामना होईल.

बंडखोरी करून देखील भाजपने अनंतराव देशमुखांवर कारवाई केली नसल्याने शिवसेना शिंदे गटाने रोष व्यक्त केला. इतर दोन मतदारसंघात वेगळ्या भूमिकेचा पवित्रा शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्याचा परिणाम महायुतीच्या निवडणुकीतील कामगिरीवर पडण्याची दाट शक्यता आहे. रिसोडमध्ये प्रमुख तीन उमेदवारांपैकी दोन मराठा समाजातून येत असल्याने मोठ्या प्रमाणात मतविभाजन होईल. त्याचा फायदा कुणाला होणार? यावरून आता चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा

वडिलांची बंडखोरी, पुत्र विधानसभा प्रमुख

माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी रिसोड मतदारसंघात बंडखोरी केली असली तरी पुत्रासह त्यांचे समर्थक भाजपमध्ये पदांवर कायम आहेत. ॲड. नकुल देखमुख भाजपचे रिसोड विधानसभा प्रमुख आहेत. बंडखोरांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप देखील शिंदे गटाकडून होत आहे.

महायुतीच्या उमेदवारांसोबत संपूर्ण भाजप आहे. बंडखोरांवर कारवाई संदर्भातील प्रश्न वरिष्ठ स्तरावरील नेतृत्वाकडे येत असून ते योग्य निर्णय घेतील.

अनुप धोत्रे, खासदार, भाजप.
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 washim assembly constituency dispute within mahayuti print politics news css