पुणे : विधानसभेत एक चतुर्थांश प्रतिनिधित्व असलेल्या पुणे, पिंपरी, पश्चिम महाराष्ट्र आणि अहिल्यानगर या भागांतील या वेळच्या विधानसभा निवडणुकीचा तोंडवळा प्रदेशानुसार बदलताना दिसला. जात आणि शेतीपेक्षाही धर्म आणि लाभार्थी याभोवती प्रचार गुंफला गेला आणि त्याभोवती तो कायम राहील, याची दक्षताही घेतली गेली, तर प्रत्यक्ष मैदानावर बंडखोरीचे प्रवाह प्रस्थापितांना किती धक्के देऊ शकतील, याचीही चाचपणी सातत्याने होत राहिली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळपुरते बोलायचे, तर या ठिकाणच्या १२ मतदारसंघांपैकी ११ मध्ये महायुतीचेच विद्यामान आमदार असल्याने आणि ते सर्व पुन्हा स्पर्धेत असल्याने त्यांच्या प्रचाराचे मुद्दे हे त्यांनी केलेल्या कामांचे दाखले या स्वरूपाचे राहिले. प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीनेही त्याला स्थानिक पातळीवर न झालेल्या कामांच्या यादीनेच उत्तर दिले. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुख्यत: दोन्ही राष्ट्रवादींत लढत झाली आणि प्रचारात स्थानिक साखर कारखाने कुणी अडचणीत आणले, गद्दार कोण व ‘लाडकी बहीण’ विरुद्ध ‘महालक्ष्मी’ योजना असाच सामना होत राहिला.
हेही वाचा : मतदानाचे मुद्दे : पश्चिम महाराष्ट्र; मराठा आंदोलन, हिंदुत्व आणि संविधानचाही प्रभाव
पश्चिम महाराष्ट्र आणि अहिल्यानगरमधील मतदारसंघांत जवळपास प्रत्येक मतदारसंघात वेगळी ‘निवडणूक’ झाली आहे. ही लढाई इतर कशापेक्षाही त्या भागावरील वर्चस्वाची अधिक आहे. त्यामुळेच आघाडी आणि युतीचे ‘धर्म’ पाळण्यापेक्षा ‘उपयुक्त’ स्थानिकाला ताकद देण्यावर अधिक भर दिसला. ‘लाडकी बहीण’ योजनेचे महिलांनी केलेल्या लक्षणीय मतदानात प्रतिबिंब पडल्याचे निश्चित जाणवले.