यवतमाळ : कधीकाळी यवतमाळ जिल्ह्यात कुणबी समाजाचे राजकीय वर्चस्व होते. गेल्या दशकात समाजाचे हे वर्चस्व कमी झाल्याने कुणबी समाजात खदखद आहे. समाजातील काही नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांनी जाणीवपूर्वक कुणबी समाजाला सक्रिय राजकारणातून बाजूला सारल्याची खंत कुणबी समाजाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळीसुद्धा विधानसभा निवडणुकीत सर्वच महत्वाच्या राजकीय पक्षांनी कुणबी-मराठा समाजाला उमेदवारी पासून वंचित ठेवले. त्यामुळे यवतमाळ विधानसभा मतदार संघात कुणबी मराठा समाज तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाचे ७५ हजारांवर मतदान आहे. १९५२ ते २०२४ पर्यंत नऊ वेळा कुणबी समाजाचा उमेदवार या मतदारसंघात निवडून आला. १९९५ मध्ये राजाभाऊ ठाकरे हे भाजपच्या तिकीटवर निवडून आलेले कुणबी समाजातील अखेरचे आमदार ठरले. त्यानंतर १९९९ पासून आजपर्यंत येथे कुणबी समाजाचा उमेदवार निवडून आला नाही. कुणबी समाजाचे मतदार सर्वाधिक असुनही या समाजाला प्रतिनिधीत्व मिळत नसल्याने समाजात नाराजी आहे.

हेही वाचा : अनेक माजी मंत्री, आमदारांचा बंडखोरी करून विजयाचा इतिहास, देशमुख, केदार, बंग, जयस्वाल आदींचा समावेश

जिल्ह्यात अलिकडच्या काळात दिवंगत उत्तमराव पाटील यांनी कुणबी समाजाचे नेतृत्व केले. त्यांच्या निधनानंतर मात्र हा समाज विखुरला. माणिकराव ठाकरे हे राज्यात, देशात काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असतानाही, जिल्ह्यातील कुणबी समाजाला दिशा मिळाली नसल्याची समाजाची भावना आहे. भाजपचे राजाभाऊ ठाकरे यांनी कुणबी समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याही नेतृत्वात कुणबी समाज संपूर्णपणे संघटित झाला नाही. सामाजिक आणि राजकीय पातळीवर घसरण झाल्याची सल कुणबी समाजाला आहे. समाजातील ज्येष्ठ नेत्यांनीच नवीन नेतृत्व पुढे येवू दिले नसल्याचा आरोप आता काही तरूण उघडपणे करत आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कोणाच्या बाजूने उभे राहावे, हे ठरविण्यासाठी सकल कुणबी समाजाने रविवारी सहविचार सभा घेतली.

यवतमाळमध्ये महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, तसेच बच्चु कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष निवडणूक रिंगणात उतरला आहे. दरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी डावलल्यामुळे कुणबी-मराठा समाज तिसरा पर्याय देण्याची तयारी करीत आहे. या सभेत प्रहार पक्षाचे उमेदवार बिपीन चौधरी हे आवर्जून उपस्थित होते. प्रहार जनशक्ती पक्षाने बिपीन चौधरी या तरूणास उमेदवारी देवून समाजाला संधी दिल्याने यवतमाळातील सकल कुणबी समाजाने एकवटले पाहिजे, अशी भूमिका यावेळी उपस्थितांनी मांडली.

हेही वाचा : भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचे धनंजय मुंडेंसमोर आव्हान

हक्काने मत मागण्याचा अधिकार

सर्व शाखेय कुणबी-मराठा समाजाने सहविचार सभेचे आयोजन केले ही आनंदाची बाब आहे. गेल्या दहा वर्षापासून सामाजिक कार्यात आणि विविध आंदोलनात मी सक्रिय आहो. कोरोना काळात सर्वच समाजातील अडचणीत असलेल्या नागरीकांना मदत केली. त्यामुळे हक्काने मत मागण्याचा मला अधिकार आहे. कुणबी-मराठा समाजासह सर्वच समाजातून पाठींबा मिळत असल्याचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया प्रहारचे उमेदवार बिपीन चौधरी यांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 yavatmal kunbi community neglected by political parties print politics news css