चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा पूर्ण झाला. या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी काँग्रेस नेते आत्मचिंतन करणार का? जिल्हा व शहर काँग्रेस अध्यक्ष बैठक घेऊन पराभवामुळे खचलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणार का? कार्यकर्त्यांना आत्मविश्वासाचे बळ देणार का? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर व जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे एकत्र येणार की, या तिन्ही नेत्यांची तोडं तीन दिशांना राहणार, उमेदवार व पदाधिकारी यांना पराभूत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होणार का, असे विविध प्रश्न सध्या काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना पडले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालेल्या काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत धुव्वा उडाला. जिल्ह्यातील पाचपैकी एक मतदारसंघ ब्रह्मपुरीत वडेट्टीवार हरता हरता जिंकले. त्यांचा विजय हा देखील एकप्रकारे पराभव आहे, अशीच चर्चा मतदारांमध्ये आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते पराभूत मानसिकतेत गेले आहेत. पदाधिकारी पराभवाच्या धक्क्यातून अजूनही सावरलेले नाहीत. अशावेळी पक्ष नेतृत्वाने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याची, त्यांना बळ देण्याची गरज आहे. मात्र, निकाल लागून आठ दिवसांपेक्षा अधिक दिवस उलटले तरी जिल्हाध्यक्ष धोटे, शहराध्यक्ष रामू तिवारी यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची साधी बैठकसुद्धा घेतली नाही, पराभवाच्या कारणांवर चर्चा केली नाही, आत्मचिंतन केले नाही. पराभूत झाल्यानंतर धोटे काँग्रेसची बैठक घेण्याऐवजी नागपूरला जाऊन बसले होते.

हेही वाचा >>>Two Child Policy : आंध्र प्रदेशनंतर तेलंगणातही दोन अपत्यांसंदर्भात निर्णय रद्द होणार? दक्षिणेकडील राज्यांना सतावतेय ‘ही’ चिंता

जिल्ह्यात पक्षाचे पानिपत झाले असून याची जवाबदारी स्वीकारून धोटे आणि तिवारी राजीनामा देणार का, असा प्रश्न पदाधिकारी विचारत आहेत. महापालिकेतील माजी गटनेते,  विरोधी पक्षनेते, शहराध्यक्ष व त्यांचे विश्वासू सहकारी यांची विधानसभा निवडणुकीतील भूमिका व सक्रियता अनाकलनीय राहिली आहे. असे असतानाही वडेट्टीवार यांची त्यांच्यावर विशेष मर्जी आहे. सेवादलाचे अध्यक्ष निवडणुकीत सक्रिय नसल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी काँग्रेस नेते खासदार मुकुल वासनिक यांना वडेट्टीवार घेऊन गेले होते. सेवादल अध्यक्ष भाजप उमेदवाराचे घनिष्ठ मित्र आहेत. जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष यांच्या गच्छंतीनंतर माझ्या मतदारसंघातून कुणाचीही जिल्हास्तरावर नियुक्ती नको, या जिल्हाध्यक्ष धोटेंच्या भूमिकेमुळे कुंदा जेनेकरांना डावलून दोन वर्षांपासून खासदारांच्या अवतीभोवती दिसणाऱ्या सुनंदा धोबेंची जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष पदावर नेमणूक झाली. विशेष म्हणजे, त्यांची दोन्ही मुले आजही शिवसेनेत आहेत.

हेही वाचा >>>कोकणातील ढासळलेले गड सावरण्याचे उद्धव ठाकरेंपुढे मोठे आव्हान

एकूणच जिल्ह्यातील काँग्रेसचा संपूर्ण कारभार विस्कळीत झालेला आहे. हा विस्कळीत कारभारच पराभवाला कारणीभूत ठरल्याचा दावा काँग्रेसमधूनच केला जात आहे. जिल्ह्यात नावाला एक आमदार व एक खासदार आहे. त्यातही चंद्रपूर मुख्यालयी दोघांपैकी कुणीच नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मुख्यालयात काँग्रेस पक्ष पोरका झाला, अशीच काहीशी स्थिती आहे. ही स्थिती बदलायची असेल तर कार्यकर्ते व पदाधिकारी यांना बळ देणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election congress lost in chandrapur district due to disrupt working print politics news amy