ठाणे : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या मताधिक्यामुळे विजयाची खात्री असलेल्या भिवंडी पश्चिम या मुस्लिम बहुल मतदारसंघात महाविकास आघाडीच्या म्हणजेच काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने उभा केलेला उमेदवार, काँग्रेस पक्षात झालेली बंडखोरी आणि त्यात एमआयएमने उभा केलेला उमदेवार यामुळे झालेल्या मत विभाजनाचा फायदा भाजपचे आमदार महेश चौगुले यांना होऊन त्यांचा विजय झाला. दोन निवडणुकीत मतविभाजनामुळेच चौगुले यांचा विजय झाला होता, यंदाही हीच परंपरा कायम असल्याचे चित्र दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) हे विजयी झाले. त्यांनी महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत खासदार म्हात्रे यांना भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून ६२ हजारांचे तर भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ६० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज वर्तविला जात होता. यातील भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात समाजवादी पक्षाला मिळाली होती. याठिकाणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत शेख हे विजयी झाल्याने येथे महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले. असे असले तरी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचा – दक्षिण नागपूरमध्ये ओबीसी मतांचे ध्रुवीकरण भाजपच्या पथ्यावर

हेही वाचा – अमरावती जिल्‍ह्यात राजकीय सूडचक्राचा अंत की सुरुवात?

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपने आमदार महेश चौगुले यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसने दयानंद चोरघे यांना उमेदवारी दिली होती. तर, काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे विलास पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षातर्फे रियाज आझमी यांनी तर एमआयएमतर्फे वारीस पठाण यांनी निवडणूक लढवली. यामुळे मुस्लिम बहुल मतदार असलेल्या मतदारसंघातील मुस्लिम मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा महेश चौगुले यांना झाल्याचे दिसून येते. यात काँग्रेस उमेदवार दयानंद चोरघे यांच्यापेक्षा सपाचे उमेदवार रियाज आझमी आणि अपक्ष उमेदवार विलास पाटील यांना जास्त मते मिळाली आहेत.

उमेदवारांना मिळालेली मते

महेश चौगुले (भाजप) ७० हजार१७२ (विजयी)

रियाज आझमी (सपा) ३८ हजार ८७९

विलास पाटील (अपक्ष- काँग्रेस बंडखोर) ३१ हजार ५७९

दयानंद चोरघे (काँग्रेस) २१ हजार ९८०

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election result 2024 bjp benefits from vote split again in bhiwandi west print politics news ssb