विधानसभा निवडणुकीत पार धुव्वा उडाल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) या तिन्ही पक्षांना एकत्रित लढल्याशिवाय राज्यसभा अथवा विधान परिषदेची जागा जिंकणे शक्य होणार नाही.
राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ४२ पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता असते. विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान असल्यास पहिल्या पसंतीची २७ मते तर ११ जागांसाठी निवडणूक असल्यास २४ मते लागतात. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे तेवढी मते नाहीत. यामुळे महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास राज्यसभेची एक जागा निवडून येऊ शकते. विधान परिषद निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र राहिले आणि मतांची फाटाफूट झाली नाही तर दोन जागा निवडून येऊ शकतात. अर्थात, निवडणुकीतील अपयशानंतर तिन्ही पक्षांमध्ये किती मधूर संबंध राहतात यावर सारे अवलंबून आहेत.
हेही वाचा – चंद्रपूर : भाजपमध्ये प्रवेश करताच किशोर जोरगेवार यांचे मताधिक्य ५० हजारांनी घटले
हेही वाचा – ना भाजप ना कमळ, ओन्ली सुमित… भाजपच्या विक्रमी विजयाचा मंत्र
राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे पाच उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाल्यास महायुती सहावी जागाही जिंकू शकते. यामुळेच राज्यसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्ष एकत्र राहिले तरच एका जागेवर समाधान मानता येईल. राज्यसभेची पुढील निवडणूक ही एप्रिल २०२६ मध्ये होईल. तेव्हा महाविकास आघाडीतील शरद पवार व फौझीया खान (राष्ट्रवादी), काँग्रेसच्या रजनी पाटील आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी हे निवृत्त होत आहेत. शरद पवार यांनी विधानसभा प्रचारात संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तिन्ही पक्ष पुढील दीड वर्षे एकत्र राहिले आणि जागा कोणी लढवायची यावरून वाद झाला नाही तरच महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.
काँग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले असले तरी त्यांचा राज्यसभा किंवा विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग सोपा राहिलेला नाही. यापूर्वी विधानसभेत पराभूत झाल्यास मागील दाराने विधान परिषदेचा मार्ग पत्करून आमदारकी मिळवली जात असे. पण यावरही आता निर्बंध आले आहेत.