नागपूर : राज्यात सर्वत्र मोठी वाताहत झाली असली तरी संघ मुख्यालय आणि दीक्षाभूमी असलेल्या राज्याच्या उपराजधानीत काँग्रेसने पश्चिम आणि उत्तर नागपूर या दोन जागा वाचवण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे पश्चिम नागपुरात तर अतिशय अटीतटीच्या लढतीत विकास ठाकरे यांनी मतदारसंघ राखला, लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर दिल्याने उंचावलेली प्रतिमा, दांडगा जनसंपर्क आणि संघटन कौशल्य हे घटक त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरले आहेत.
पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचा एक भाग विकसित आणि दुसरा नव्याने विकसित होत आहे. येथे सोबतच काही झोपडपट्या देखील आहेत. विकास ठाकरेंनी ही बाब समजून घेऊन त्या-त्या वस्त्यांमधील लोकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित केले. गेल्या पाच वर्षांत आमदार म्हणून त्यांनी नवीन वस्त्यांमध्ये विकास कामांवर भर दिल्याने या भागातील सर्व जाती-धर्माची जनता त्यांच्याविषयी अनुकूल होती. तसेच झोपपट्टी भागात ते सातत्याने संपर्क ठेवून होते. लोकांच्या अडीअचणीला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
हेही वाचा – उत्तर महाराष्ट्रातील मविआच्या एकमेव विजयाने शिरीष नाईक चर्चेत
लोकसभेतील लढतीचा फायदा
ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी गडकरी यांना कडवे आव्हान दिले होते. त्यातून ते ‘फायटर’ म्हणून उदयास आले. त्यामुळे त्यांचे राज्याच्या राजकारणात वजन तर वाढले, पण धर्मनिरपेक्ष विचाराच्या जनसमूहांमध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली. परिणामी मतदारांमध्ये त्यांच्यासाठी सहानभूती होती. तसेच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पश्चिम नागपूरमध्ये केलेला ‘रोड शो’ देखील ठाकरेंच्या बाजूने वातावरण निर्मिती करणार ठरला.
भाजपचा उमेदवार बाहेरचा
दुसरीकडे भाजपने यावेळी मतदारसंघाबाहेरील सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली. दक्षिण नागपूरचे माजी आमदार कोहळे यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपने केला. परंतु त्यांच्यासाठी हा मतदारसंघ नवीन होता. त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क नव्हता. ते पूर्णपणे पक्ष संघटनेवर अवलंबून होते. येथे भाजपचे पक्ष संघटन मजबूत आहे. तसेच भाजप हिंदी भाषक मतदारांचे हिंदूत्वाच्या मुद्यांवर मतांचे ध्रुवीकरण करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे कोहळे यांना ९० हजारांहून अधिक मतांचा पल्ला गाठता आला. पण, ठाकरे यांचा विजयरथ रोखण्यात ते अपयशी ठरले.
हेही वाचा – ठाणे शहरात मनसेची प्रचारात केवळ हवाच, निकालात मात्र पिछेहाट
काँग्रेसमधून निलंबित नरेंद्र जिचकार यांच्यामुळे होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ होईल, असा विश्वास भाजपला होता. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि बसपामुळे मतविभाजन होईल, असेही भाजपचे गणित होते. जिचकार यांनी नऊ हजारच्या जवळपास मते घेतली, पण इतरांचे फार काही चालले नाही. आणि ठाकरे सलग दोनदा विजय संपादन करून पश्चिम नागपुरात काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.