जळगाव – जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपचे संकटमोचक म्हटले जाणारे गिरीश महाजन यांनी सातव्यांदा विजय मिळवला. मात्र, महाजन यांच्यासाठी यावेळची निवडणूक खूपच आव्हानात्मक ठरली. कारण, ३० वर्षात प्रथमच त्यांच्या विरोधातील उमेदवाराने एक लाखांवर मते मिळवली आहेत. आणि ही कमाल राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार दिलीप खोडपे यांनी केली आहे.
जामनेरच्या सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणारे गिरीश महाजन हे १९९५ पासून सतत विधानसभेवर निवडून आले आहेत. ११९५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढणाऱ्या महाजन यांनी काँग्रेसचे तत्कालिन उमेदवार ईश्वरलाल जैन यांचा २० हजार मतांनी पराभव केला होता. १९९९ मध्येही महाजन यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार ईश्वरलाल जैन यांचा १४,९३७ मतांनी पराभव केला होता. २००४ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार संजय गरूड यांचा २९,३१३ मतांनी तर, २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी करणाऱ्या संजय गरूड यांचा ७५१७ मतांनी, २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे डी. के. पाटील यांचा ३५,७६८ मतांनी आणि २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय गरूड यांचा ३५,०१४ मतांनी पराभव केला होता.
१९९५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली तेव्हा महाजन यांना ६३,६६१ मते मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या मतांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत गेली. ३० वर्षांच्या कालखंडानंतर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना १,२८,६६७ मते मिळाली. आणि प्रतिस्पर्धी दिलीप खोडपे यांचा त्यांनी २६,८८५ मतांनी पराभव केला. मात्र, महाजन यांना यावेळी विरोधकांकडून मोठे आव्हान निर्माण करण्यात आल्याने पक्षाचे स्टार प्रचारक असूनही त्यांनी मतदारसंघ वगळता इतरत्र प्रचारासाठी जाणे जवळपास टाळले. दोन ते तीन वेळा त्यांनी नाशिक, धुळे या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने मतदारसंघ सोडला होता. मागील ३० वर्षात त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या एकाही उमेदवाराने मिळवली नव्हती, तेवढी मते राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप खोडपे यांनी यंदा मिळवली. महाजन यांच्या विरोधात आतापर्यंत संजय गरूड यांनी तीनवेळा, ईश्वरलाल जैन यांनी दोनवेळा आणि डी.के.पाटील यांनी एकदा निवडणूक लढवली. पैकी गरूड यांना फक्त २००९ च्या निवडणुकीत सर्वाधिक ८१,५२३ मते मिळाली होती. त्यानंतर आता खोडपे यांनी १,०१,७८२ मते मिळवून महाजन यांच्यासाठी पुढील वाटचाल खडतर राहणार असल्याचा एकप्रकारे संदेश दिला. या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये महाजन यांनी त्यांच्या समोरच्या विरोधकांना सहजपणे नामोहरम केले होते; परंतु, खोडपे यांचा पराभव करणे त्यांच्यासाठी यंदा सोपे नव्हते. खोडपे हे प्रभावी मराठा नेते म्हणून ओळखले जातात. जामनेर मतदारसंघात सुमारे दीड लाखावर मराठा समाजाचे मतदार असल्याने त्याचा मोठा फायदा त्यांना झाला. परंतु, लाडक्या बहिणी पाठीशी राहिल्याने महाजन यांना विजय सुकर झाला.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या कल्याणासाठी जिवाचे रान करू! मुख्यमंत्र्यांची ग्वाही
पारंपरिक प्रतिस्पर्धी संजय गरूड भाजपमध्ये
गिरीश महाजन यांच्या विरोधात सर्वाधिक तीनवेळा शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील संजय गरूड यांनी निवडणूक लढवली होती. यंदाही दोघांमध्ये लढत होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, लोकसभा निवडणुकीपूर्वी गरूड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आपल्याला जामनेर तालुक्यात आता कोणी विरोधक राहिलेला नाही, असे महाजन यांनी सांगितले होते. परंतु, एकेकाळी त्यांच्याबरोबर काम केलेले जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी राष्ट्रवादीत (शरद पवार) प्रवेश करून त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले.