अकोला : विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यात प्रस्थापित पक्षांचे गड अभेद्य राहिले आहेत. भाजप दोन, तर काँग्रेसने एका जागेवर आपले वर्चस्व कायम राखले. वाशीम व कारंजा मतदारसंघात जातीय समीकरण व मतविभाजन महायुतीसाठी पोषक ठरले, तर रिसोड मतदारसंघात महायुतीतील कुरबुरी काँग्रेसच्या पथ्यावर पडली. या निकालामुळे दिग्गज नेत्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
वाशीम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आकांक्षित वाशीम जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न, अडचणी, समस्यांऐवजी राजकीय पुनर्वसन, पक्षांतर, बंडखोरी, पक्षांतर्गत नाराजी आदी मुद्दे निवडणुकीत चर्चेत आले होते. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव वाशीम मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात चुरशीचा सामना झाला. विद्यमान आमदाराचे तिकीट कापून भाजपने श्याम खोडेंना संधी दिली. वंचितची साथ सोडून डॉ. सिद्धार्थ देवळे शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात होते. मतदारसंघात दोन्ही बाजूला प्रचंड अंतर्गत नाराजी होती. शिवाय हिंदू दलित व बौद्ध दलित या वादातून मतविभाजन झाले. जातीय समीकरणासह ६.८९ टक्के वाढलेले मतदान देखील भाजपसाठी पोषक ठरले. वाशीममध्ये भाजपने विजयी चौकार लगावला असून उमेदवार बदलण्याची पक्षाची खेळी यशस्वी ठरली.
हेही वाचा – महाराष्ट्राच्या कल्याणासाठी जिवाचे रान करू! मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कारंजा मतदारसंघात महायुतीमध्ये तडजोड झाली. भाजपच्या सई डहाके यांनी एकतर्फी विजय मिळवला. भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पूत्र ज्ञायक पाटणी राष्ट्रवादी श.प.गटाकडून रिंगणात होते. वंचितचे सुनील धाबेकर व एमआयएमचे युसुफ पुंजानी यांनी ५५ हजारावर मते घेतली. चौफेर लढतीतील मतविभाजनाचा भाजपला फायदा झाला. जातीय समीकरण देखील भाजपसाठी फायदेशीर होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सहज कायम राखता आला. कारंजा मतदारसंघातील घराणेशाही चर्चेत होती.
रिसाेड मतदारसंघ सर्वाधिक लक्षवेधी लढत होती. महायुतीत हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला. त्यामुळे उमेदवारीसाठी दीड वर्षापूर्वी भाजपवासी झालेले माजी राज्यमंत्री तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी पुन्हा एकदा बंडखोरी केली. अपक्ष अनंतराव देशमुख, काँग्रेसचे अमित झनक यांच्यामध्येच लढत झाली, तर महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार भावना गवळी तिसऱ्या स्थानावर घसरल्या. रिसोडमध्ये महायुतीमध्ये कुरबुरी होती. अनंतराव देशमुखांना भाजपचे छुपे पाठबळ असल्याचा आरोप देखील शिवसेना शिंदे गटाकडून झाला. रिसोडमध्ये जातीय समीकरणात मराठा समाजाची निर्णायक भूमिका होती. जुलै महिन्यातच विधान परिषदेवर वर्णी लागलेल्या भावना गवळी पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरल्याचे अनेकांना रुचले नाही. त्यामुळे मराठा समाजाची गठ्ठा मते अमित झनक यांच्या पारड्यात गेल्याचे बोलल्या जाते. अनंतराव देशमुखांच्या बंडखोरीचा मोठा फटका महायुतीला बसला आहे. भाजपच्या लाटेतही काँग्रेसचे अमित झनक यांना सलग चौथ्यांदा जागा कायम राखण्यात यश आले. आता अनंतराव देशमुखांच्या पुढील भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्रीपदाचा ‘बिहार पॅटर्न’ राबवा! शिंदे गटाची मागणी
मातृशक्तीचे बळ
वाशीम जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांमध्ये महिलांच्या मतदानाचा टक्का चांगलाच वाढला. २०१९ मध्ये ५९.८० टक्के महिलांचे मतदान होते. आता ६५.९९ टक्के महिलांनी आपला हक्क बजावला. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून महिला मतदानांवर लक्ष केंद्रित केले होते. त्याचा फायदा निवडणुकीत झाल्याचा अंदाज आहे.