रत्नागिरी : कोकण हा ठाकरे यांच्या शिवसेनेचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र मागील लोकसभा निवडणुकी पासून ते आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी पीछेहाट झालेली पहायला मिळत आहे. त्यामुळे आता कोकणातील ढासळलेले गड सावरण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करुन ती कोकणात मोठ्या प्रमाणावर रुजविली. कोकण म्हटले की, ठाकरे यांची शिवसेना तळागाळात पहावयास मिळत होती. मात्र आता थोडी परिस्थिती बदलली आहे. कोकणातून ठाकरेंच्या शिवसेनेचे अस्तीत्व कमी होत असल्याचे दिसत आहे. मागील लोकसभा निवडणूकीमध्ये शिवसेना ठाकरेंच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला. रायगड लोकसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला होता. तर तळ कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून माजी खासदार विनायक राऊत यांचा भाजपाचे उमेदवार विद्यमान खासदार नारायण राणे यांनी पराभव केला. शिवसेना फुटीनंतर कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेचे अस्तित्व कमी होत गेल्याचे दिसून येऊ लागले आहे.
शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट असे दोन भाग शिवसेनेचे झाल्याने शिवसेना कार्यकर्ते विखुरले गेले. याचा फटका ठाकरे गटाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पेकी चार मतदार संघातून शिवसेना विरुध्द शिवसेना अशी लढत बघायला मिळाली. त्यामध्ये दापोली विधानसभा मतदार संघातून शिंदे गटाकडून योगेश कदम आणि ठाकरे गटाकडून संजय कदम यांच्यात लढत झाली. त्यामध्ये योगेश कदम हे पुन्हा आमदार झाले. तसेच गुहागर मतदार संघातून शिंदे गटाकडून राजेश बेंडल तर ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांच्या लढत होऊन भास्कर जाधव कमी फरकांच्या मतांनी निवडून आले. रत्नागिरी विधानसभेत ठाकरे गटाचे बाळ माने यांना हारवून शिंदे गटाचे उदय सामंत पाचव्यांदा आमदार झाले. राजापुर लांजा मतदार संघातून ठाकरे यांच्या शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला. येथे ठाकरे गटाचे राजन साळवी यांना शिंदे गटाच्या किरण सामंत यांच्याकडून हार पत्करावी लागली. रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त गुहागर मतदार संघावरच ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले. बाकीचे मतदार संघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व संपुष्ठात आले. याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांपेकी एकाही मतदार संघावर ठाकरेंची शिवसेना भगवा फडकवू शकली नाही. हे तिन्ही मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले.
हेही वाचा : महायुतीत समन्वयाचा अभाव नाही; ‘मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय मोदी, शहा घेतील’, एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
सावंतवाडी मतदार संघातून दिपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे राजन तेली यांचा पराभव केला. कुडाळ मतदार संघातून शिंदे गटाचे नीलेश राणे यांनी ठाकरे गटाचे वैभव नाईक यांचा पराभव केला. रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठी हार पत्करावी लागल्याने कोकणातील हे बालेकिल्ले पुर्णपणे ठासळलले. कोकणातील या दोन शिवसेनेमुळे मतदार ही संभ्रामावस्थेत असल्याने कोकणात कोणत्या शिवसेनेचे राज्य चालणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र कोकणातूनच मोठ्या झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामुळे ढासळलेले गड सावरण्याच्या मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.