बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपनेत्यांकडून प्रचार सभांमध्ये काँग्रेस राजवट आणि भाजप सरकार, अशी तुलना केली जाते. केंद्रात काँग्रेसने ६० वर्षांच्या तुलनेत जेवढी विकासकामे केली नाही, तेवढी आम्ही १० वर्षांच्या काळात केली, असा दावा भाजपकडून केला जातो. याच धर्तीवर मलकापूर मतदारसंघात प्रचाराच्या निर्णायक टप्प्यात विकासकामांवरूनच माजी आमदार चैनसुख संचेती (महायुती) आणि विद्यमान आमदार राजेश एकडे (आघाडी) यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. संचेती यांच्या आमदारकीची सलग २५ आणि एकडेंच्या पाच वर्षांतील विकासावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात विकासकामे हाच मुख्य मुद्दा केंद्रस्थानी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९९५ पासून ते २०१४ पर्यंत मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व गाजवताना संचेती यांनी आमदारकी कायम ठेवली. २०१९ मध्ये नवख्या एकडे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. हा घाव जिव्हारी लागलेले संचेती यंदा सातव्यांदा आखाड्यात उतरले आहेत. त्यांनी आपला वचननामा सादर करताना एकडे यांच्यावर विकासावरून टीकास्त्र सोडले. एकडे हे गेल्या पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासाबाबत सपशेल अपयशी ठरले आहे. त्यांच्या कार्यकाळात मलकापूर मतदारसंघ विकासापासून वंचित राहिल्याची टीका संचेती यांनी केली. एकडे यांच्यावर निष्क्रिय आमदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. मागील पाच वर्षांत लक्षात ठेवण्याजोगे एकही काम झाले नसून मतदारसंघ विकासमुक्त राहिला. एखाद्या रस्त्याचा विकास अथवा एखादा पूल बांधणे, याला विकास म्हणता येणार नाही, सर्वांगीण विकासात आरोग्य, शिक्षण, रोजगार व सिंचन हे चार घटक महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टीने कसलीच विकासात्मक प्रगती या मतदारसंघात झालेली नाही. माझा २५ वर्षांचा आमदारकीचा कार्यकाळ आणि आमदार एकडे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ याची तुलनाच होऊ शकत नाही. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात केवळ विकासाच्या पोकळ घोषणा झाल्यात, भूलथापा देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्यात आली, अशा शब्दात संचेती एकडेंवर टीका करतात. २५ वर्षांचा कालखंड व पाच वर्षांचा कार्यकाळ पाहता मतदारसंघाचा आपण जो प्रचंड विकास केला त्याला आजही तोड नाही. दीड लाख हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात आपल्याच कार्यकाळात झाली. या प्रकल्पाला पूर्णत्वास आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहो. आधी मोबदला नंतर जमीन अधिग्रहण यासाठी आपण दिलेल्या लढ्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नदी, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करून पाण्याची पातळी वाढवून भूजल पातळीत वाढ करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्या काळात १७४ बंधारे बांधल्या गेले. पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा खेड्यातील रुग्णांना खाटेवर टाकून रुग्णालयात आणावे लागत होते. ते चित्र बदलून आपण शासकीय आरोग्य आस्थापन, मुख्य मार्ग आणि जोड रस्ते यांचे जाळे विणले. मात्र काँग्रेस आमदाराच्या आताच्या कार्यकाळात मात्र तसे काही चित्र दिसले नाही, असे मुद्दे संचेती यांच्याकडून प्रचारात उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा – भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका

आमदार एकडे यांनी प्रचारात या मुद्याला खोडण्याचे प्रयत्न चालविले आहे. मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्यात विरोधी महायुतीचे सरकार असतानाही हा निधी खेचून आणल्याचे ते प्रचारसभांतून सांगतात. सभागृहात सर्वात जास्त प्रश्न उपस्थित करणारा मी जिल्ह्यातील एकमेव आमदार ठरलो, याचीही ते आठवण करून देतात. संचेती यांनी २५ वर्षांत काय केले याचे उत्तर द्यावे, असे आवाहन एकडे करीत आहेत. यामुळे हा ‘२५ विरुद्ध ५ वर्ष’वरून रंगणारा कलगीतुरा मतदारांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे.

हेही वाचा – लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?

कामगिरीला पीएच.डी.ची साक्ष

आमदार संचेती यांनी कामगिरी सिद्ध करण्यासाठी पीएच.डी.चा पुरावा दिला आहे. माझ्या पंचवीस वर्षांच्या आमदारकीच्या कामगिरीवर प्रबंध सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनीला अमरावती विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली. मलकापूरमधील अलका जाधव ही ‘डॉक्टर’ झाली. माझ्या विधानसभा सभागृहातील तारांकित प्रश्न, लक्षवेधी, २९२, २९३ वरील चर्चा आदींचा उहापोह करून तिने साडेतीनशे पृष्ठांचा प्रबंध सादर केला होता. त्याला पीएच.डी. मिळणे म्हणजे माझ्या चांगल्या कामगिरीवर शिक्कामोर्तबच म्हणावे, अशी बाब असल्याचे माजी आमदार संचेती सांगताहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha elections 2024 malkapur the issue of development works is at the center of the campaign competition between chainsukh sancheti and rajesh ekde print politics news ssb