मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पक्ष फुटीनंतर शिवसेना (ठाकरे) विरुद्ध शिवसेना (शिंदे) असा सामना ४७ मतदारसंघांत होणार आहे. यामध्ये मुंबईतील १२ लढती लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षापेक्षा शिवसेना ठाकरे पक्षाच्या दोन जागा जास्त निवडून आलेल्या आहेत. काही प्रमुख मतदारसंघातील उमेदवार पराभूत झाल्याची सल शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे शिंदे यांच्या खासदारांच्या मतदारसंघात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य शिवसेना ठाकरे पक्षाने ठेवले आहे. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे अशी लढत आहे. राज्यात या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही वाचा : राजकारणातील बड्या चेहऱ्यांची यंदा वंचितकडे पाठ

ठाकरे पक्षाचे मुंबईत तीन खासदार निवडून आलेले आहेत. अमोल कीर्तीकर यांचा मात्र निसटता पराभव झाला. ठाकरे पक्षाचे मुंबईत वर्चस्व असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही शिवसेनेतील मुंबईत होणाऱ्या लढती त्यामुळे लक्षवेधी ठरणाऱ्या आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर व महेश सावंत यांची लढत महत्वाची आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पूत्र आमित ठाकरे माहीममधून पहिल्यांदाच मैदानात उतरले आहेत.