गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघात यंदा पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार, असा प्रश्न चर्चिला जात आहे. येथे भाजपचे विजय रहांगडाले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रविकांत बोपचे यांच्यात थेट लढत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१४ आणि २०१९ मध्ये येथे अपक्ष उमेदवार दिलीप बनसोड यांच्यामुळे तिरंगी लढत झाली होती. २०१४ च्या निवडणुकीत रहांगडाले यांनी बनसोड यांचा पराभव केला होता, तर २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार बनसोड यांच्यामुळे झालेल्या मतविभागणीचा फटका राष्ट्रवादीला बसला होता. त्यावेळी रहांगडाले यांनी रविकांत बोपचे यांचा पराभव केला होता.

हेही वाचा – भाजपचे विजय रहांगडाले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रविकांत बोपचे यांच्यात थेट लढत आहे.

यावेळी राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. रहांगडाले यांच्यासमोर बोपचे यांचे कडवे आव्हान आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून काँग्रेसकडून बोपचे यांना पूर्ण मदत मिळते आहे. रहांगडाले यांच्या दहा वर्षांतील कामगिरीबाबत जनतेत नाराजी जाणवते. दलित आणि मुस्लीम मतांचे गणित जुळवण्यात महायुतीचे नियोजन पूर्णपणे चुकल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. या मतदारसंघात पोवार समाजाचे बाहुल्य असून ४८ हजार दलित आणि १८ हजार मुस्लीम मतदार आहेत. त्यांना आपल्याकडे खेचण्यात रहांगडाले आणि महायुतीचा आटापिटा सुरू आहे. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये रहांगडाले आणि बोपचे यांच्यात पोवार समाजाचे समसमान मतविभाजन झाल्याचे दिसते. मतदारसंघात ३४ हजारांच्या संख्येत असलेल्या गोंड गोवारी समाजाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

हेही वाचा – भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका

विद्यमान आमदार रहांगडाले यांना भाजपची सत्ता असतानाही विकास निधी खेचून आणण्यात हवे तेवढे यश मिळाले नाही, असा मतप्रवाह येथे आहे. यामुळे तिरोडा मतदारसंघात जातीय समीकरण आणि विकासकामे हेच महत्त्वाचे मुद्दे ठरतील, असे सध्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha elections 2024 tiroda constituency direct fight between vijay rahangdale bjp and ravikant bopche ncp sharad chandra pawar party print politics news ssb