मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी १४ आंबेडकरी पक्षांचे तब्बल ४३७ उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे २३७ तर ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे २०० उमेदवार आहेत. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे दलित मतदारांमध्ये दुभंग असून आंबेडकरी पक्षांची उमेदवार संख्या वाढल्याने दोन्ही मुख्य आघाड्यासंमोर आव्हान उभे राहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात विधानसभेच्या आखाड्यात यावेळी ५९ पक्षांचे २०५० आणि अपक्ष २०८६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामध्ये १३ आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांचे ४३७ उमेदवार (२१ टक्के) आहेत. आंबेडकरी पक्षांनी अनुसूचित जातींसह इतर जात घटकांना उमेदवारी दिली असली तरी यामध्ये बौद्ध उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी २०० जागा लढवत असून त्यामध्ये ९४ उमेदवार बौद्ध आहेत.

हेही वाचा – वाशीममध्ये भाजप व शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजीचे आव्हान, दलितांमध्ये रोषाची भावना; जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर?

बसप २३७, वंचित २००, बीआरएसपी २२, रिपाइं (अ ) ३१, रिपब्लिकन सेना २१, भीमसेना १४, आंबेडकराईट रिपब्लिकन पार्टी ५, बहुजन समाज पार्टी (आंबेडकरी) ५, रिपब्लिकन बहुजन सभा २, रिपाइं (खोब्रागडे) २, रिपाइं (डेमोक्रेटीक) २, रिपाइं (रिफॉर्म) १ आणि ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी १ असे पक्ष आणि त्यांचे उमेदवार विधानसभा लढवत आहेत. महायुती व महाविकास आघाडीत सामील असलेल्या अनेक आंबेडकरी गटांना विधानसभेची उमेदवारी मिळालेली नाही. त्यामध्ये पीआरपी (कवाडे), रिपाइं (आठवले), रिपाइं (खरात), रिपाइं (प्रोग्रेसीव्ह), रिपाइं (युनायटेड) असे आणखी आंबेडकरी गट, पक्ष व संघटना या निवडणुकीत सक्रीय आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार राज्यात १ कोटी ३२ लाख अनुसूचित जातीची लाेकसंख्या असून त्यामध्ये ५९ जाती आहेत. या गटात ६० टक्के वाटा एकट्या बौद्ध समाजाचा आहे. अनुसूचित जातींसाठी राज्यात २९ विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. यावेळी अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा व त्याला उत्पन्नाची अट लावण्याचा मुद्दा चर्चेत आहे. त्यामुळे अनुसूचित जातीच्या मतदारांमध्ये दुभंग निर्माण झाला आहे.

हेही वाचा – तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?

आंबेडकरी पक्षांची उमेदवार संख्या वाढल्याने निळ्या झेंड्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे मुंबईतील लालबागच्या निवडणूक साहित्याच्या बाजारात निळ्या झेंड्याचा मोठा तुडवटा निर्माण झाला आहे. राज्यात वंचित आणि बसप हे दोन आंबेडकरी मोठे पक्ष आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचितला २.८ टक्के आणि बसपला ०.७ टक्के मते मिळाली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha elections 2024 vanchit bahujan aghadi bahujan samaj party candidate buddhist candidate print politics news ssb