अकोला : वाशीम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप व शिवसेना उबाठामध्ये तुल्यबळ लढत असली तरी दोन्ही बाजूला अंतर्गत नाराजीचे मोठे आव्हान आहे. भाजपने विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यासह ऐनवेळी कार्यकारिणीत बदल केल्याने पक्षामध्ये खदखद निर्माण झाली. दुसऱ्या बाजूला वंचितमधून आयात उमेदवाराला शिवसेना उबाठाने रिंगणात उतरवले. ॲड. प्रकाश आंबेडकरांची साथ सोडून हातात मशाल घेत लढणाऱ्या डॉ. सिद्धार्थ देवळेंविषयी दलित समाजामध्येच तीव्र रोषाची भावना आहे. समीकरण जुळवणे दोन्ही प्रमुख उमेदवारांसाठी अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव वाशीम मतदारसंघात यावेळेस भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात चुरशीचा सामना आहे. भाजपने भाकरी फिरवत चार वेळा आमदार राहिलेल्या लखन मलिक यांची उमेदवारी कापली. श्याम खोडे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला. परिणामी, भाजपमध्ये नाराजी व गटबाजीचे राजकारण वाढले. पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने कार्यकारिणीत देखील बदल केले. कार्यकारी अध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून पक्षाचे जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ते प्रचारापासून देखील दूर आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना स्वत: खुलासा करण्याची वेळ आली. भाजपमधील या गोंधळ्याच्या वातावरणामुळे संघ परिवारामध्ये देखील असंतोष पसरला आहे. महायुतीसह परिवाराला एकत्रित ठेवण्याची कसरत श्याम खोडेंना करावी लागत आहे.
हेही वाचा – तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
दुसरीकडे गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीच्या तिकीटावर दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. वंचित आघाडीने त्यांच्यावर अमरावती विभागीय अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी दिली होती. शिवसेनेत जाताना डॉ. देवळे यांनी वंचित आघाडीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देखील सोबत नेले होते. मात्र, नंतर बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाकडे परत आल्याचे वंचितचे म्हणणे आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांची साथ सोडल्यामुळे डॉ. देवळेंविषयी बौद्ध समाजामध्येच तीव्र रोषाची भावना आहे. वंचितने मेघा डोंगरे यांना उमेदवारी देऊन पर्याय दिला. वंचित आघाडीने ही जागा प्रतिष्ठेची केली. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी स्वत: येथे प्रचार सभा घेत वातावरण निर्मिती केली. वाशीममध्ये बौद्ध समाजाचे मतविभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत. त्याचा मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला बसू शकतो. दोन्ही बाजूला बंडखोरी देखील आहे. गेल्या वेळेस अपक्ष लढून ४५ हजारावर मते घेणारे शशिकांत पेंढारकर पुन्हा एकदा अपक्षच लढत आहेत. वाशीम मतदारसंघात हिंदू व बौद्ध दलित असा देखील वाद आहे. यासर्व पार्श्वभूमीवर दलित, मुस्लीम, मराठा, कुणबी, माळी आदींसह विविध गठ्ठा मतदारांची भूमिका निर्णायक ठरेल.
कारंजाचा वाशीमवर परिणाम
कारंजामध्ये नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक राष्ट्रवादीची तुतारी घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले. जिल्हा भाजपांतर्गत पाटणी यांचे वर्चस्व होते. कारंजातील घडामोडीमुळे पाटणी समर्थक पदाधिकारी नाराज असून त्याचा परिणाम वाशीममध्ये देखील होऊ शकतो.