नागपूर : लोकसभा निवडणूक भारतीय जनता पक्षासाठी ‘करो या मरो’ या स्वरुपाची होती. त्यामुळे प्रचारात कुठलीही उणीव या पक्षाने ठेवली नव्हती. १० जागा असलेल्या विदर्भात पक्षाचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच मतदारसंघात सभा घेतल्या. यावरून या भागाचे महत्व या पक्षाला किती आहे हे स्पष्ट होते. पण ते नागपूरला दोन वेळा येऊनही त्यांनी राज्याच्या उपराजधानीत एकही सभा घेतली नाही. हेच चित्र विधानसभा निवणुकीतही कायम राहिले. मोदी विदर्भात आले नागपूर विमानतळावरून ते चंद्रपूरला गेले. पण नागपूरला सभा घेणे टाळले. ते का ? याची राजकीय वर्तुळात सध्या चांगलीच चर्चा आहे.

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत शिवाजी पार्कवर राज्यातील निवणुकीची शेवटची प्रचार सभा पार पडली. या निवडणुकीतही त्यांनी राज्य पिंजून काढले. त्यांनी पश्चिम विदर्भातील अकोला आणि पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघात प्रचार सभा घेतली. चिमूरला जाण्यासाठी त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. तेथे त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. नागपूरमध्ये सभा न घेता ते पुढच्या प्रवासाला गेले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत नागपुरात सभा न झाल्याने आता ते नागपूरला सभा घेतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण तसे झाले नाही.

हेही वाचा – ‘बाळापूर’ दोन्ही शिवसेनेसह वंचितसाठी आव्हानात्मक, लढतीला धार्मिक रंग; मतविभाजन निर्णायक

लोकसभा निवडणुकीत ‘नागपूर’ला टाळणे यामागे पक्षांतर्गत नेत्यांसोबतच्या वादाची किनार होती. पण विधानसभा निवडणुकीत मात्र असे चित्र नाही. नागपूर जिल्ह्यातून मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, (दक्षिण-पश्चिम नागपूर) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (कामठी) यांच्यासह अनेक महत्वाचे नेते निवडणूक लढवत आहेत. या शिवाय नागपूरला दीक्षाभूमी आहे. काँग्रेसने लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही संविधानाचा मुद्दा लावून धरला आहे. नागपूरला सभा घेऊन काँग्रेसच्या प्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची संधी भाजपकडे होती. लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. त्यात पूर्व विदर्भातील नागपूर या ऐकमेव जागेचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण १२ जागा आहेत. २०१४ मध्ये भाजपने ११ जागा जिंकल्या होत्या. भाजपची सध्याची प्रत्येक जागा जिंकण्याची चढाओढ लक्षात घेता मोदींनी नागपूरला येऊन सभा न घेणे या बाबात आश्चर्य व्यक्त केले जाते.

हेही वाचा – साकोलीत पटोले, करंजेकर व ब्राह्मणकर अशी तिहेरी लढत, तेली, कुणबींच्या मतांवर विजय अवलंबून

राहुल, प्रियंकाचे दौरे

एकीकडे मोदी नागपूर विमानतळावर येऊन शहरात सभा घेत नाही तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधान सन्मान संमेलनाच्या निमित्ताने पक्षाच्या प्रचाराचा नारळच नागपुरातून फोडला. या कार्यक्रमात राहुल यांनी पुन्हा संविधानाचा मुद्दा उपस्थित करून निवडणूक प्रचाराचा कलच पालटून टाकला होता. त्यानंतर त्यांची गोंदिया आणि शनिवारी चिमूरमध्ये सभा होत आहे. प्रियंका गांधी या रविवारी नागपूरमध्ये रोड शो करीत आहे. अडचणीच्या काळात विदर्भाने काँग्रेसला साथ दिली हा पूर्वइतिहास आहे हे येथे उल्लेखनीय.

Story img Loader