Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून विधानसभेच्या अध्यक्षपदासह अनेक महत्वाची पदे मिळाल्याने आणि दरम्यान काळात झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळाल्याने त्याचे श्रेय नाना पटोले यांना मिळत गेले. त्यामुळे ते पक्षात नशीबवान समजले जाऊ लागले. लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसचा यशाचा आलेख राज्यात उंचावला. परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्याने त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला झाला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरलेल्या काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. काँग्रेसला केवळ १६ जागा जिंकता आल्या. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हा पहिला मोठा पराभव आहे.

हेही वाचा – Buldhana Assembly Election Result 2024 : ‘हरियाणा पॅटर्न’मुळे महायुतीचा दबदबा; ‘काँग्रेसमुक्त बुलढाणा’चे डावपेच यशस्वी

भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे आमदार असलेले नाना पटोले काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. त्यांनी भाजपकडून २०१४ ची लोकसभा निवडणूक लढली आणि जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. मात्र, ते तेथे जास्त काळ रमले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि ओबीसीच्या मुद्यावरून त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांनी २०१७ मध्ये खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना २०१८ मध्ये किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले. महाविकास आघाडीची सरकार राज्यात आल्यानंतर २०१९ मध्ये त्यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आले. परंतु त्यांना या पदाचा देखील राजीनामा दिला. ते २०२१ मध्ये काँग्रेसचे २८ वे प्रदेशाध्यक्ष झाले. आणि आक्रमकपणे संघटना मजबूत करण्यास सुरुवात केली.

यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात कॉंग्रेसने विजय मिळाला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी उत्तम होती. तसेच सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने १३ जागा जिंकल्या. त्यामुळे आपसूकच याचे श्रेय नानांना मिळाले. ते पक्षात नशिबवान समजले जाऊ लागले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पटोलेंच्या नेतृत्वात कॉंग्रेसला घवघवीत यश मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. स्वतः नाना पटोले यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी घेतले जाऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारुण पराभव नानांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून गेला. या निवडणुकीत स्वत: नानांचा निसटता विजय झाला. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख एकदम खाली आला आहे.

हेही वाचा – भिवंडी पश्चिमेत पुन्हा मत विभाजनाचा भाजपला फायदा

विदर्भाने लाज राखली

विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या पक्षाला विदर्भाने कायम साथ दिली आहे. आताही पडझडीच्या काळात १६ पैकी नऊ जागा विदर्भातील आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत तब्बल १३ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे कौतुक झाले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha result congress performance in election bhandara district sakoli nana patole career congress print politics news ssb