स्वबळ न तपासताच ठाकरे गटाचा ‘त्या’ बारा जागांवरील आग्रहाने पेच

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा वाद विकोपाला गेला असून त्यासाठी पूर्व विदर्भातील १२ जागा कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते.

uddhav Thackeray and congress
स्वबळ न तपासताच ठाकरे गटाचा 'त्या' बारा जागांवरील आग्रहाने पेच ( संग्रहित छायाचित्र )

नागपूर : जिंकण्याची क्षमता असणाऱ्या पक्षालाच जागा सोडली जाईल, या मुळ आधारावर जागा वाटपाच्या चर्चेला बसलेल्या शिवसेना (ठाकरे) नेत्यांनी प्रत्यक्षात मात्र पूर्व विदर्भातील ज्या १२ जागांसाठी घेतलेली आग्रही भूमिका मूळ आधारालाच छेद देणारी असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहेत.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा वाद विकोपाला गेला असून त्यासाठी पूर्व विदर्भातील १२ जागा कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते. त्यावर तडजोड करण्यास काँग्रेस व ठाकरे गट तयार नाही. या मतदारसंघामध्ये मुख्याने आरमोरी, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चिमूर, बल्लारपूर, चंद्रपूर, रामटेक, कामठी, दक्षिण नागपूर, अहेरी, भद्रावती- वरोरा, बल्लारपूर या मतदारसंघाचा समावेश आहे. या १२ पैकी एकही मतदारसंघ महाविकास आघाडीकडे नाही. हे येथे उल्लेखनीय.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचाच दबदबा ?

विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, या पक्षाची पाळेमुळे गावा-गावा पर्यंत पोहचलेली आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. त्या आधारावर काँग्रेसने वरील जागांवर मागणी केली आहे. मात्र शिवसेनेचा जागांच्या आग्रहाला पक्षाची ताकद, संघटनात्मक पाठबळ, कार्यकर्ते याचा आधार नसल्याचे दिसून येते. कधी काळी एखाद दुसरी निवणूक जिंकली होती म्हणून त्याआधारावर सेनेने काही मतदारसंघावर दावा केला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी आणि गडचिरोली मतदारसंघाचे देता येईल. जिल्ह्यात सेनेचा एक आमदार दोन दशकापूर्वी निवडूनआला होता. आता तेथे सेनेची स्वबाळाची शक्ती नाही, गडचिरोलीमध्येही हीच स्थिती आहे, सेनेचा एक जिल्हाप्रमुख नुकताच राष्ट्रादीत गेला आहे, अशा स्थितीत सेनेने या जिल्ह्यात तीन जागा मागितल्या आहेत. अहेरीच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा आहे, कारण तेथे एकसंघ राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार आहे.

असाच प्रकार नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि दक्षिण नागपूर या दोन मतदारसंघाबाबत आहे. २०१४ पासून शिवसेनेचा रामटेकमध्ये आमदार नाही, सध्या तेथे अपक्ष आमदारआहे, सेनेत फूट पडल्याने संघटना खिळखीळी झाली आहे.जिंकण्यासाठी लागणारी रसद सेनेच्या नेत्यांकडे नाही, या उलट चित्र या मतदारसंघावर दावा करणाऱ्या काँग्रेसचे आहे. या पक्षाचे नेते राजेंद्र मुळक यांनी मागील पाच वर्षापासून मतदारसंघावर काम करणे सुरू ठेवले आहे. काँग्रेसची संघठना आणि मतदार आहे, त्यामुळे येथे काँग्रेसचा दावा अवाजवी ठरत नाही, पण केवळ २०१४ पूर्वीच्या निवडणुकीचा आधार घेऊन शिवसेनेने घेतलेली आग्रही भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही घटक पक्षासाठी मारक ठरणारी आहे. दक्षिण नागपूर ही जागा काँग्रेसने २०१९ मध्ये अत्यंत कमी मतांनी गमावल्याने या जागेवर याच पक्षाचा हक्क आहे, मात्र केवळ शहरात एक जागा हवी म्हणून सेनेने काँग्रेस जिंकू शकेल अशा जागेवर दावा करणे अनाकलनीय मानले जात आहे.

हेही वाचा : बबनराव लोणीकर यांना सलग आठव्यांदा उमेदवारी

गोंदियावर सेनेने दावा केला आहे. २०१९ चा अपवाद सोडला तर अनेक वर्ष येथून काँग्रेसचा आमदार निवडून येत होता. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले व नंतर पराभूत झालेले गोपाल अग्रवाल पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहे. त्यांच्यासाठी काँग्रेसने गोंदियाची जागा मागितली आहे. भाजप-सेना येती होती तेव्हा गोंदिया हा भाजपकडे होता. पण यावेळी सेनेने हा मतदारसंघही प्रतिष्ठेचा केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, भद्रावती-वरोरा, बल्लारपूर असे चार मतदारसंघ सेनेला हवे आहे. वडेट्टीवार शिवसेनेत होते तेव्हा चिमूरमधून निवडून आले होते. ते काँग्रेसमध्ये येऊन दोन दशकाहून अधिक काळ झाला.तेथे आता भाजपचा आमदार आहे, काँग्रेस हा तेथील दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारा पक्ष आहे, पण सेना येथेही आग्रही आहे. दिवंगत बाळू धानोरकर हे सेनेत असताना भद्रावतीमधून निवडून येत होते.ते काँग्रेसमध्ये आल्यावर सेनेचा या मतदारसंघावरील प्रभाव कमी झाला, २०१९ मध्ये येथे प्रतीभा धानोरकर विजयी झाल्या होत्या. पण शिवसेनेला ही जागा सोाडायची नाही, विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने या पक्षाचा या जागेवर दावा आहे.

हेही वाचा : बीडमध्ये विधानसभेच्या तोंडावरच भाजपच्या डोकेदुखीत वाढ; जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, संगीता ठोंबरेही ‘वेगळ्या’ विचारात

चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षात जाण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचा पक्ष प्रवेश झाल्यास विद्यामान आमदार म्हणून त्यांच्यासाठी चंद्रपूरची जागा पवार गटाने मागितली आहे, मात्र या जागेवरही सेनेने दावा करून आघाडीपुढे पेच निर्माण केला आहे. बल्लारपूर असो किंवा भंडारा या मतदारसंघात संघटनात्मक पातळीवर सेना कमकुवत आहे. ही बाब मान्य न करता केवळ विदर्भात अधिक जागा हव्या हे धोरण ठेवून सेनेची वाटचाल सुरू असल्याने याचा फटका आघाडीतील अन्य घटक पक्षांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra vidhan sabha uddhav thackeray and congress dispute for 12 seats of east vidarbh print politics news css

First published on: 21-10-2024 at 16:11 IST
Show comments