छत्रपती संभाजीनगर – धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून दुखावलेले भाजपचे स्थानिक बहुतांंश कार्यकर्ते, पदाधिकारी अजूनही ‘घड्याळा’च्या प्रचारात सक्रीय झालेले दिसत नाहीत. चाळीस वर्षात यंदा प्रथमच परळीत ‘कमळ’ चिन्ह नसल्याचाही परिणाम भाजप विचारधारेच्या कार्यकर्त्यांवर असून, मतदानाची वेळ जवळ आलेली असतानाही त्यांची सक्रियता दिसत नाही. त्यांना प्रचारात सक्रीय करण्याचे आव्हान धनंजय मुंडेंच्या यंत्रणेपुढे उभे आहे. परळीत धनंजय मुंडे यांनी कमळ चिन्ह घेतले असते तर बरे झाले असते, असे पंकजा मुंडे यांनी नुकतेच केलेले विधानही कार्यकर्त्यांची मनोवस्था सूचित करणारेच मानले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परळीत विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रीय होण्याचे आवाहन करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी गोपीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने दीपावली स्नेहमीलन मेळावा आयोजित करण्यात आला होता. याच मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचे बोट डोळे झाकले तरी कमळ चिन्हावरच पडते एवढी त्यांच्यामध्ये विचारधारा रुजलेली आहे. आता त्यांना घड्यावर बोट ठेवून मतदान करा म्हणून सांगताना मोठी अडचण वाटत असल्याचे सांगून पंकजा यांनी खरं तर धनंजय मुंडे हे कमळ चिन्ह घेऊनच लढाले असते तर बरे झाले असते, असे विधान केले होते. तर धनंजय मुंडे यांना याच मेळाव्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना अंतर देणार नसून, पंकजा मुंडेंचा भाऊ या नात्याने सन्मानाची वागणूक देत पाठीमागे उभे राहणार असल्याची ग्वाही द्यावी लागली. शिवाय पंकजा मुंडेंच्या मंत्रीपदाबाबतचेही सूतोवाच केले होते. मात्र, भविष्यात राष्ट्रवादीचे (अजित पवार) स्थानिक पदाधिकारी पुन्हा आक्रमक होऊन भाजप कार्यकर्त्यांना बेदखल करतील किंवा त्रास देतील, अशी भीती भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. पंकजा मुंडे यांच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना अडचणीत आणूनच त्यांना राष्ट्रवादीत घेतल्याची आठवण सांगताना मागील पाच वर्षांमध्ये विचारधारेला बांधिल असलेला एकही सर्वसामान्य कार्यकर्ता धनंजय मुंडे यांच्याकडे गेला नसल्याचा दावा केला जातो.

हेही वाचा : ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?

परळी मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा जवळपास ३२ हजारांच्या फरकाने पराभव केला होता. पंकजा मुंडे यांना ९२ हजारांवर मते मिळाली होती. त्यातील ५० ते ६० हजार मते ही गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या विचारांनी बांधलेली भक्कम मतपेढी असल्याचे मानली जाते. यातील कार्यकर्त्यांना यंदा चाळीस वर्षांत प्रथमच कमळ चिन्ह नसल्याची बाब अस्वस्थ करत आहे. त्यांना प्रचारात सक्रीय करण्याचे आव्हान धनंजय मुंडेंच्या यंत्रणेसमोर आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabhan election 2024 chhatrapati sambhaji nagar assembly constituency dhananjay munde challenge to turn the hurted candidate of bjp to him print politics news css