गोंदिया : जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि आमगाव देवरी या चारही मतदारसंघांत बंडखोरीचे पीक आले आहे. महायुतीला बंडखोरी शमवण्यात काही ठिकाणी यश आले असले, तरी महाविकास आघाडीची मात्र डोकेदुखी वाढली आहे. गोंदिया मतदारसंघात काँग्रेसकडून गोपालदास अग्रवाल महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे अग्रवाल यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिरोडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी केल्याचे दिसून येते. ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे. यामुळे नाराज झालेले काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे, राधेलाल पटले, माजी सभापती पी.जी. कटरे आणि अर्चना ठाकरे या चार इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

हेही वाचा >>> राजू शेट्टी यांच्या राजकारणाला ओहोटी

अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्या आमगाव-देवरी मतदारसंघात महाविकास आघाडीने विद्यमान आमदार सहेसराम कोरेटी यांना उमेदवारी नाकारून त्यांच्याऐवजी सेवानिवृत्त सनदी अधिकारी राजकुमार पुराम यांना उमेदवारी दिली. यामुळे कोरेटी यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. येथे भाजपमध्येही बंडखोरी झाली. शंकर मडावी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, ते माघार घेणार असल्याचे भाजप वर्तुळात बोलले जात आहे.

हेही वाचा >>> इडीने छळले. सत्तेशी जुळले, धन फळफळले

अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघात महाविकास आघाडीने माजी आमदार दिलीप बनसोड यांना उमेदवारी दिली. मात्र, ते बाहेरील असल्याचा आक्षेप घेत अजय लांजेवार आणि किरण कांबळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे अधिकृत उमेदवारासह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने डावलल्याने विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनीही बंडाचा झेंडा उंचावला आहे. त्यांनी आपल्या मुलाला रिंगणात उतरवले आहे. डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहारकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय भाजपचे रत्नदीप दहिवले यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharastra vidhan sabha election 2024 rebel spoiled mva candidates winning chances in gondia constituency print politics news zws