पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली असताना महायुतीत कोणत्या पक्षाने लढायचे हे अद्यापही ठरलेले नाही. महायुतीत रस्सीखेच असून, भाजप, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा अद्यापही सोडला नाही. खासदार श्रीरंग बारणे हे महायुतीचा मीच उमेदवार असल्याचे सांगत असले तरी धनुष्यबाण की कमळावर लढायचे हे निश्चित होत नसल्यानेच मावळमध्ये महायुतीचे घोडे अडल्याचे समजते. चिन्ह भाजपचे उमेदवार शिवसेनेचा असे होऊ शकते अशी जोरदार चर्चा शहर भाजप-शिवसेनेच्या गोटात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बदलली असून महायुतीची ताकद दिसत आहे. मतदारसंघातील सहाही आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. बारणे यांना भाजपनेही उमेदवारी देऊ नये अशी शेळकेंची भूमिका आहे. दुसरीकडे भाजपचे बाळा भेगडेही तीव्र इच्छुक आहेत. भाजपने यंदा कमळ चिन्हाचा आग्रह धरला आहे. उमेदवार कोणीही असो, पण कमळावर लढणारा असला पाहिजे. १५ वर्षांपासून मतदारसंघात कमळ चिन्हावर निवडणूक लढली नाही. त्यामुळे या निवडणुकीत कमळ चिन्ह असले पाहिजे, असा आग्रह भाजपने धरला आहे. खासदार श्रीरंग बारणेंनी मी महायुतीचा उमेदवार असेल, असे ठामपणे म्हटले आहे. पण, कमळावर लढणार की धनुष्यबाणावर? यावर त्यांनी मी महायुतीचा उमेदवार असेल असे म्हणत संदिग्धता कायम ठेवली आहे. खासदार बारणे हे कमळावर निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चिन्ह भाजपचे उमेदवार शिवसेनेचे बारणे असे होईल अशी चर्चा भाजप-शिवसेनेच्या गोटात आहे.

हेही वाचा – जिंकण्याची क्षमता असेल तरच जागा मागा, शहा यांनी शिंदे-पवारांना बजावले !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा निर्णय घेतला त्यावेळी भाजपचे नेते, देशाचे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आमच्यात एक बैठक झाली. त्याबैठकीत शहा यांनी स्पष्ट सांगितले होते. त्याच जोरावर मी महायुतीचा उमेदवार असेल असे खासदार बारणे यांनी सांगितले. उमेदवारी मागण्याचा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. त्यात काही गैर नाही. आमदार शेळके यांचा विरोध आणि भाजपच्या भेगडे यांच्या उमेदवारीच्या मागणीबाबत मी काही बोलणार नाही. माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या-त्या पक्षाचे प्रमुख नेते निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. त्यामुळे पुढील आठवड्यात महायुतीत मावळ मतदारसंघात कोण उमेदवार असणार हे स्पष्ट होऊ शकते.

हेही वाचा – भाजपला प्रादेशिक पक्षांच्या मैत्रीची आवश्यकता का भासू लागली ?

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांनी प्रचार सुरू केला आहे. विरोधक कमळाच्या चिन्हावर लढल्यास उलट निवडणूक सोपी होईल. कारण भाजपच्या विरोधात सुप्त लाट असून मला फायदा होईल असा दावा त्यांनी केला. पण, वाघेरे यांच्या प्रचारात महाविकास आघाडीचे पदाधिकारी दिसत नाहीत. शरद पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेसचा एकही पदाधिकारी त्यांच्यासोबत दिसला नाही. प्रचाराला सुरुवात करताना ठाकरे गटाचे माजी आमदारही त्यांच्या सोबत दिसले नाहीत. वाघेरे यांची भिस्त जुन्या पक्षातील सहकाऱ्यांवरच दिसत आहे. आमच्यावर त्यांचा विश्वास दिसत नसल्याचे सांगत ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी खासगीत नाराजी व्यक्त केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi became the frontrunner in maval lok sabha seat uncertainty still in the mahayuti print politics news ssb