गेल्या पाच वर्षांत शिवसेना व राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षात फूट पडली असली तरी नेहमी चर्चेत असलेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षात मोठी फूट पडलेली नाही. पण लागोपाठ दोन वर्षे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली आहेत. यंदा पुरेशी मते नसतानाही तिसरा उमेदवार उभा करण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणूक पार पडली आणि महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार अशी चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे आमदार फुटणार अशी आवई तेव्हा उठली होती. करोनामुळे सारे व्यवहार ठप्प झाले आणि राजकीय आघाडीवर सामसूम होती. अशोक चव्हाण यांच्यापासून काँग्रेसच्या विविध नेत्यांची नावे फुटण्याच्या यादीत घेतली जात होती. मंत्रिपद न मिळालेले आमदार संपर्कात असल्याची कुजबूज भाजपच्या गोटातून केली जात होती. यातून काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण होते.

हेही वाचा : भाजपमधील वादाला शिंदेगटाची फोडणी?

दोन वर्षांपूर्वी याच काळात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसला होता. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. यापाठोपाठ अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत फूट पडली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षात फूट पडली. पण काँग्रेस विधिमंडळ पक्षात अशी मोठी फूट पडलेली नाही. अशोक चव्हाण यांनी पक्षांतर केले. अन्य काही आमदार सत्ताधारी पक्षाच्या संपर्कात आहेत. पण काँग्रेस विधिमंडळ पक्ष फुटीपासून वाचला होता.

काँग्रेस विधिमंडळ पक्षात फूट पडलेली नसली तरी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांची मते फुटली आहेत. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर २०२० मधील विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाली होती. २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली होती. तेव्हा काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप या दोघांना उमेदवारी दिली होती. हंडोरे यांना अधिकची मते तर भाई जगताप यांना अतिरिक्त मतांबरोबरच विजयाचे गणित जुळविण्यासाठी त्यांनी बाहेरून मते मिळवावीत, अशी व्यूहरचना होती. पण हंडोरे यांना दिलेली मतेच भाई जगताप यांच्याकडे गेली. परिणामी दुसऱ्या क्रमांकावरील जगताप निवडून आले तर हंडोरे पराभूत झाले.

हेही वाचा : दिल्लीत पाणी तुटवडा, मुख्यमंत्री अटकेत आणि पक्षाला गळती; आप आमदाराने सोडला पक्ष

यंदा काँग्रेसची सहा ते सात मते फुटल्याचा संशय आहे. पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना ३० मतांचा कोटा देण्यात आला होता. पण त्यांना पहिल्या पसंतीची पाच मते कमी पडली. अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले तीन ते चार आमदारांची मते काँग्रेसने गृहित धरली नव्हती. याशिवाय दोन नेत्यांच्या घरातील मतांबाबत काँग्रेस नेत्यांना संशय होता. चार ते पाच मतांबाबत आम्हाला खात्री नव्हती. पण दोन अतिरिक्त मते फुटली ही बाब काँग्रेसने गांभीर्याने घेतली आहे. फुटलेल्या आमदारांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

Story img Loader