सोलापूर : सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जागा पळवापळवीचे लोण सोलापुरातही आले आहे. यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दिलेल्या उमेदवारांवरून महाविकास आघाडीमध्ये जागांचा तिढा कायम आहे. दरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातही भर पत्रकार परिषदेत राडेबाजीचा प्रकार घडला. शिव्यांची लाखोली वाहिली गेली असता अखेर ज्येष्ठ पत्रकारांना त्यात हस्तक्षेप करून राडेबाजीचा प्रकार थांबवावा लागला. एकूणच सांगोला, माढापाठोपाठ आता सोलापूर दक्षिण, शहर मध्य अशा चार मतदारसंघांतील जागावाटपावरून महाविकास आघाडीत संघर्ष सुरू झाला असून यावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीमध्ये सोलापूर दक्षिण व सांगोला या दोन जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवार दिल्यामुळे काँग्रेस व शेकाप हे दोन मित्र पक्षांची मोठी अडचण झाली आहे. यापूर्वी २००९ साली काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे सोलापूर दक्षिणमधून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ अशा सलग दोन वेळा भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडून काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. मात्र दोन्ही वेळा काँग्रेसचे उमेदवार द्वितीय स्थानावर राहिले होते. त्याचा विचार करता ही जागा काँग्रेसचीच आहे, असा दावा या पक्षाकडून केला जात आहे. काँग्रेसचे दिलीप माने हे सोलापूर दक्षिणची जागा आपल्या पक्षाला सुटावी आणि आपणासच उमेदवारी मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन चालविले आहे. वीरशैव लिंगायत समाजातील बडे प्रस्थ असलेले सिद्धेश्वर देवस्थान, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, संगमेश्वर महाविद्यालय, दै. संचार वृत्तपत्र अशा स्वरूपात कार्याचा व्याप सांभाळणारे धर्मराज काडादी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ही जागा लढविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. दावेदारीचा हा वाद वाढत असताना त्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने अमर रतिकांत पाटील यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तिन्ही मित्र पक्षांत कोणाचा पायपोस कोणात राहिला नसल्याचे दिसून येते.
हेही वाचा : चैनसुख संचेती सातव्यांदा ‘मलकापूर ‘ रणसंग्रामात! मागील लढतीतील प्रतिस्पर्धीच रिंगणात, दुरंगी लढत अटळ
u
सांगोला मतदारसंघाची जागा महाविकास आघाडी अंतर्गत शेकापला सुटल्याचा दावा केला जात असताना तेथेही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आयात केलेले पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे यांना अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सांगोल्यातही गोंधळाची स्थिती दिसून येते.