मुंबई : विरोधकांच्या महाविकास आघाडीत (मविआ) जागा वाटपाचे त्रांगडे निर्माण झाले असून छोट्या पाच पक्षांनी आपल्या वाट्यास न आलेल्या मतदारसंघांतही उमेदवारी दाखल केली आहे. उद्यापर्यंत आमच्या जागा सुटल्या नाहीत तर मैत्रीपूर्ण लढतीचा किंवा बंडखोरीचा पर्याय आमच्यासमोर असल्याचे सांगत या छोट्या पक्षांनी ‘मविआ’मध्ये बंडाचा झेंडा फडकवला आहे.

‘मविआ’ मध्ये ९ पक्ष आहेत. भारतीय कम्युनिस्ट (भाकप) पक्षाला शिरपूर एकच जागा दिली आहे. पण, हा पक्ष वणी, भिवंडी पश्चिम, औरंगाबाद मध्य, हिंगणा, विक्रमगड येथे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) दोन जागा मिळाल्या आहेत. पण, हा पक्ष सोलापूर मध्य आणि नाशिक पश्चिम मतदारसंघात उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

हेही वाचा : Financial Burden on Maharashtra: मतदारांना आकर्षित करण्यासाठी २०० घोषणा; प्रतिवर्षी १ लाख कोटींचा बोजा; निवडणुकीसाठी महायुतीकडून राज्यावर बोजा?

समाजवादी पक्षाला भिवंडी पूर्व आणि शिवाजीनगर- मानखुर्द या दोन जागा सोडल्या आहेत. पण, हा पक्ष मालेगाव मध्य, भिवंडी पश्चिम आणि धुळे या अधिकच्या तीन मतदारसंघात उमेदवारी दाखल करणार आहे. धुळे व मालेगाव मध्य काँग्रेसला आणि भिवंडी पश्चिम शिवसेनेला (उद्धव ठाकरे) देण्यात आलेला आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) पनवेल, उरण, अलिबाग, पेण, लोहा आणि सांगोला या मतदारसंघावर दावा आहे. मात्र उरण आणि सांगोला हे मतदारसंघ शिवसेनेला (उद्धव ठाकरे) जाहीर झाले आहेत. या सहा जागा लढवण्यावर ‘शेकाप’ ठाम आहे.

हेही वाचा : Maharashtra Assembly Elections 2024 : दलित मविआकडे गेल्यामुळे भाजपाचा नवा प्लॅन, अनुसूचित जातींमधील छोट्या जातींवर लक्ष, महायुतीच्या गोटात काय शिजतंय?

मैत्रीपूर्ण लढती

सोलापूर मध्य येथे नरसय्या आडम यांच्यासाठी ‘माकप’ मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या विचारात आहे. छोट्या पक्षांनी बोलणी करताना एकत्र जायचे असा निर्णय घेतला होता. मात्र छोट्या पक्षांशी प्रमुख तीन पक्षांकडून वेगवेगळी चर्चा करण्यात आली. त्यातून डाव्या पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.