लोकसभा निवडणुकीत महायुतीला हात देणारा ठाणे आणि कोकण पट्टा यंदा विधानसभेलाही सत्ताधारी आघाडीसाठी महत्त्वाचा प्रदेश ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ठाणे जिल्ह्यासह कोकणमधील पाच लोकसभा जागांवरील महायुतीचे बळ वाढवणारा ठरला आहे. हेच बळ विधानसभेलाही कायम राखण्यासाठी महायुतीला प्रयत्न करावे लागणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे १८ मतदारसंघ आहेत. पालघरमध्ये सहा, रायगडमध्ये सात, रत्नागिरीत पाच तसेच सिंधुदुर्गमध्ये तीन मतदारसंघ येतात. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीत भाजपने ११ तर शिवसेनेने १५ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला पाच तर इतरांना आठ ठिकाणी यश मिळाले. विशेष म्हणजे येथे काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती.

हेही वाचा >>>Ravinder Raina’s Asset: भाजपाचा सर्वात गरीब उमेदवार; फक्त १००० रुपये रोख एवढीच संपत्ती, आमदारकीची पेन्शनही करतात दान!

शहर-ग्रामीण चित्र वेगळे?

कोकण हा शिवसेनेसाठी जिव्हाळ्याचा. फुटीनंतर शिवसेनेची कसोटी येथे लागेल. लोकसभेला रत्नागिरीची जागा ठाकरे गटाला गमवावी लागली. तर रायगडमध्ये अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंनी पुन्हा बाजी मारली. फुटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कोकणातील बहुसंख्य आमदार आले. गेल्या वेळी ठाण्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून सेनेला अप्रत्यक्ष धक्का दिला होता. मात्र भिवंडीत लोकसभेला पराभव झाल्याने तेथील विधानसभेच्या जागा राखणार का? हा मुद्दा आहे. ठाणे शहरातील चार तसेच कल्याण-डोंबिवलीतील शहरी जागांवर महायुतीची स्थिती चांगली असल्याचे चित्र आहे. मात्र ग्रामीण भागातील जागांवर चुरस राहील. येथे शरद पवार गटाचीही ताकद आहे.

जागावाटप निर्णायक

सर्वच विभागांत महायुती किंवा महाविकास आघाडीत जागावाटप हे वरिष्ठांसाठी डोकेदुखी ठरली आहे. ज्याचा आमदार त्याच्याकडे जागा हे जरी ढोबळ सूत्र धरले तरी, उर्वरित म्हणजे विरोधी आमदार असलेल्या जागांवर कोणी लढायची यावर दावे-प्रतिदावे सुरू आहेत. या विभागात महाविकास आघाडीत ठाकरे गटालाच महायुतीशी दोन हात करावे लागतील. त्यांची प्रामुख्याने येथे ताकद आहे.

पालघरमध्ये तिरंगी सामना

महायुती तसेच महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी असा तिरंगी सामना पालघरमध्ये होईल. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने जिल्ह्यातील शहरी जागांवर सातत्याने पकड ठेवली आहे. गेल्या वेळी त्यांच्या तीन जागा होत्या. वसई-विरार-नालासोपारा येथे सातत्याने वस्ती वाढत आहे. तशी मतदार रचनेतही बदल होत आहे. भाजपने याचा लोकसभेला फायदा उठवला. आता विधानसभेला या जागांवर त्यांचे लक्ष आहे.

हेही वाचा >>>प्रकल्पस्तांच्या मतांसाठी महायुतीची अखेरची धडपड, गरजेपोटी बांधकामे नियमित करण्याचा अखेर निर्णय

रायगडमध्ये आघाडी धर्माचा कस

रायगड जिल्ह्यातील सर्व सातही जागी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यातील तीनही आमदार शिंदेंबरोबर राहिले. जागावाटप जाहीर होण्यापूर्वी आतापासून अनेकांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी चालवली आहे. अशा वेळी मित्रपक्षाचे कार्यकर्ते मनापासून किती मदत करतात? यावर निकाल अवलंबून असेल. राज्यात एकेकाळी प्रबळ विरोधी पक्ष अशी ओळख असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचा जिल्ह्यात प्रभाव होता. आता ती स्थिती राहिलेली नाही. जिल्ह्यांत रासायनिक प्रकल्प मोठ्या संख्येने आल्याने रोजगार संधीही वाढल्या. मात्र सरकारने जाहीर केलेले अनेक मोठे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत अशी स्थानिकांची तक्रार आहे.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला हात देणारा ठाण्यासह कोकण पट्टा विधानसभेलाही त्यांच्याबरोबर राहणार का हा प्रश्न आहे.

सेनेच्या दोन्ही गटांत लढाई

रत्नागिरीमधील पाच तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन अशा एकूण जागांपैकी २०१९ मध्ये शिवसेनेने सहा जागा जिंकल्या होत्या. आता राज्यातील समीकरणे बदलल्यावर जिल्ह्यावर त्याचा परिणाम झाल्याचे लोकसभा निकालातून दिसून आले. मुंबईतील राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब या दोन जिल्ह्यांमध्ये उमटते. मुंबईत शिवसेनेचा विस्तार झाल्यावर त्याचे प्रत्यंतर येथेही आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे उद्याोगमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्ह्यातील. त्याच बरोबर ठाकरे गटाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव, राजन साळवी यांनाही त्यांच्या पक्षाचे आव्हान राखण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. भाजपसाठी सिंधुदुर्गमधील जागा महत्त्वाच्या आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi is going to be challenging for the konkan vidhan sabha constituency elections in the assembly elections print politics news amy
Show comments