कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट या महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुण्यात वज्रमूठ सभा आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवरील ‘मविआ’ पदाधिकाऱ्यांकडून नियोजनाच्या दृष्टीने बैठका सत्र सुरू झाले आहे. वज्रमूठ सभा कधी होणार याचा निर्णय महाविकास आघाडीचे राज्यातील नेते घेणार असले तरी जागा निश्चिती करण्याची सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन महाविकास आघआडीची वज्रमूठ सभांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्यातील नेत्यांनी घेतला होता. आगामी सर्व प्रकारच्या निवडणुकात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा निर्माण झाल्याने वज्रमूठ सभा होणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र पुण्यातील सभेपासून महाविकास आघाडीने पुन्हा वज्रमूठ आवळण्याचा निर्णय घेतला आहे. तशी हालचाल राज्यातील नेत्यांकडून सुरू झाली असून स्थानिक पातळीवरील नेत्यांनाही जागा निश्चित करण्याची सूचना करण्यात आली आहे.
हेही वाचा – राज्य काँग्रेससाठी आता नवा प्रभारी नेमावा लागणार
महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची नुकतीच काँग्रेस भवन येथे संयुक्त बैठक झाली. या बैठकीतही जागा निश्चिती बाबात चर्चा करण्यात आली. पावसाचा संभाव्या धोका लक्षात घेऊन कोणतीही जागा सभेसाठी योग्य ठरेल, याची चाचपणी करण्यात येणार आह. त्यासाठी येत्या काही दिवसांत पुन्हा महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक होईल, अशी माहिती काँग्रेसचे माजी आमदार, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली. जागा वाटपावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्माण झालेल्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा वज्रमूठ सभा होणार असल्याने पदाधिकाऱ्यांमध्येही उत्साह निर्माण झाल्याचे चित्र आहे.
सभा कधी होणार, याचा निर्णय राज्याच्या पातळीवरच होणार आहे. मात्र जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सभा होईल, असा अंदाज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. वज्रमूठ सभेची वातावरण निर्मिती करण्यासाठी महाविकास आघाडीचा पोलखोल मोर्चाही उपयुक्त ठरले, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा – भाजपचे मंत्री महिनाभर व्यस्त
महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पाच वर्षांच्या कारभाराविरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट या महाविकास आघाडीतील पक्षांकडून महापालिकेवर पोलखोल मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या १६ जून रोजी हा मोर्चा काढण्यात येणार असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चानंतर महापालिकेच्या आवारात जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे वज्रमूठ सभेलाही मोठा प्रतिसाद मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपने चुकीच्या पद्धतीने कामे केली आहेत. अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे या कारभाराची पोलखोल यानिमित्ताने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. लाल महाल येथून महापालिका भवनावर मोर्चा काढण्यात येणार असून महापालिका भवनात मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत होणार आहे,