लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या ‘जोडे मारा’ आंदोलनास भाजपने ‘खेटरे मारा’ आंदोलनाने प्रत्युत्तर दिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने केली.

पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माफी मागितली होती. तरीही महाविकास आघाडीने ‘जोडे मारा’ आंदोलन रविवारी पुकारले. त्यामुळे भाजप आणि युवा मोर्चाने ही प्रत्युत्तरादाखल आंदोलने केली.

आंदोलनाला महायुतीनेही आंदोलनातूनच प्रत्युत्तर देत आहे. नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या आंदोलनात बावनकुळे सहभाग झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी माफी मागूनही महाविकास आघाडीचे नतदष्ट नेते राजकारण करीत असून निवडणुकीच्या काळात राज्यात अराजक पसरविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी राजकारणाचा खालचा स्तर गाठला आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

हेही वाचा >>>विनोद तावडे यांचे सांगलीत बेरजेचे राजकारण

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख लुटारू, दरोडेखोर असा केला आहे. याचे उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देतील का? मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे असताना छिंदवाडा येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझर लावून पाडण्यात आला, याचे उत्तर नाना पटोले देतील का? संजय राऊत यांनी तर छत्रपती शिवरायांच्या वंशजांना वंशज असल्याचा पुरावा मागितला, याचे उत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देतील का? अफजल खान, शाहिस्तेखान नसते, तर शिवरायांची ओळख नसती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. यावर त्यांचे नेते शरद पवार उत्तर देतील का?, असे सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केले आहे.

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार, लातूर येथील आंदोलनात माजी मंत्री रावसाहेब दानवे, सिंधुदुर्गमध्ये खासदार नारायण राणे, रत्नागिरीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण, ठाणे येथे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, कराड येथे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आदी नेते आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर या आंदोलनात जोरदार टीकास्त्र सोडले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi protest in response to the collapse of the statue of chhatrapati shivaji maharaj in malvan case print politics news amy