मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून, २८८ पैकी २५०पेक्षा अधिक जागांचा तिढा सुटला आहे. अद्यापही २५ ते ३० जागांवर पक्षांनी सहमती होऊ शकलेली नाही. जागावाटपात काँग्रेस आणि शिवसेनेच्या (ठाकरे) पक्षाच्या वाट्याला प्रत्येकी १००च्या आसपास, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला ७५ ते ८० जागा येतील, असे सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीच्या नेत्यांची शुक्रवारी पुन्हा बैठक होणार आहे. बैठकीला शिवसेना नेते (ठाकरे) खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आणि इतर नेते उपस्थित होते. आतापर्यंत २५० वर जागांवर एकमत झाले असून उर्वरित जागांचा तिढाही लवकरच सुटेल असे सांगण्यात आले. आघाडीच्या प्रत्येक मित्रपक्षाकडून किमान १२ जागांचा आग्रह धरण्यात आला आहे. त्यामुळे या मित्रपक्षांना कोणत्या जागा द्यायचा याचा तिढा सोडवूनच पुढील जागा निश्चित केल्या जाणार आहे.

हेही वाचा >>>नांदेड पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी, सहानुभूतीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न

मुंबईत शिवसेनेला (ठाकरे) सर्वाधिक जागा मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांचा तिढा सुटला असून शिवसेना (ठाकरे) १८, काँग्रेस १५ तर राष्ट्रवादी काँग्रेस २ जागा लढणार आहे. समाजवादी पक्षाला १ जागा देण्याचे निश्चित झाले असून कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवर पेच आहे. २०१९ साली मुंबईतील ३६ जागांपैकी युतीमधील शिवसेनेने १९ तर भाजपने १७ जागा लढविल्या होत्या. यातील फक्त मालाड मतदारसंघात भाजपचा उमेदवार पराभूत झाला, शिवसेनेला मानखुर्द, अणुशक्तीनगर, वांद्रे-पूर्व, धारावी आणि मुंबादेवी अशा पाच ठिकाणी हार पत्करावी लागली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत असताना काँग्रेसने २९, राष्ट्रवादी काँग्रेसने ६ आणि समाजवादी पक्षाने १ अशा जागा लढविल्या होत्या. त्यापैकी काँग्रेसला ४, राष्ट्रवादीला १ आणि सपाला १ जागेवर यश मिळाले होते.

हेही वाचा >>>कौटुंबिक कलह टाळण्यासाठी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांची माघार

काँग्रेसची पहिली यादी २० ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीचे जागावाटप उद्या शुक्रवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता विजय वडेट्टीवार यांनी वर्तविली. काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला येण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसच्या वाट्याला आतापर्यंत ८४ जागा आल्या आहेत. २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्याचदिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते, असे वडेट्टीवार म्हणाले.

समाजवादी पक्ष नाराज

अपेक्षेनुसार जागा सोडण्यात येत नसल्याने समाजवादी पक्षात नाराजी आहे. पक्ष एक किंवा दोन जागांवर समाधान मानणार नाही. पक्षाला अपेक्षेनुसार जागा वाट्याला न आल्यास वेगळा लढण्याचा विचार होऊ शकतो, असा इशारा आमदार अबू आसिम आझमी यांनी दिला. यावर समाजवादी पक्षाला योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल, असे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

आम आदमी पक्षात गोंधळ

विधानसभा निवडणूक लढवू नये, असे आम आदमी पक्षात मतप्रवाह आहे. पण राज्यातील नेत्यांनी काही जागा तरी लढल्या पाहिजेत, असा आग्रह धरला आहे. पक्षाचा अद्याप काहीही निर्णय झालेला नाही, असे पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavikas aghadi seat allocation for assembly elections is in the final stage print politics news amy