Mahavikas Aghadi Seat Sharing : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीसह इतर काही पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, सध्या महाविकास आघाडीतील तिनही पक्षांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे, तर दुसरी यादीही लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, असं असलं तरी महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेसमध्ये काही मतदारसंघावरून मतभेद असल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, तर काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानेही ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता जाहीर झालेल्या यादीतील काही उमेदवारांच्या नावात देखील बदल होण्याची शक्यता असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. दरम्यान, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट किमान १०० जागा मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. जेणेकरून महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रिपदावर दावा सांगता येईल. यासाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात स्पर्धा सुरु असल्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशामुळे काँग्रेसच्या नेत्यांमध्येही उत्साह आहे. कारण लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते. त्यामुळे काँग्रेसही मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मात्र शांतपणे त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडण्यावर आणि त्यांच्या प्रचाराची उभारणी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. सुमारे ७० ते ७५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) निवडणूक लढवेल असं वाटत होतं. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्ष महाविकास आघाडीच्या दोन पक्षांबरोबर ८५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या आघाडीतील तीनपैकी कोणीही मुख्यमंत्री पदावर दावा सांगू शकतो. दरम्यान, राष्ट्रवादीच्या (एसपी) झोळीतील अतिरिक्त जागा ही पवारांची राजकीय ताकद दाखवून देऊ शकतात. कारण योगायोगाने लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (एसपी) सर्वोत्तम स्ट्राइक रेट मिळवला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांनी जागावाटपाच्या चर्चेदरम्यान चतुराईने मित्रपक्षांबरोबर काही मतदारसंघांची अदलाबदल करून काही जागा सोडल्या आणि जास्त जागा मिळवल्या. उदाहरणार्थ त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पाटणची जागा जी गेल्या १० वर्षांत त्यांच्या पक्षाने जिंकली नव्हती. ती सेनेला (ठाकरे गट) मराठवाड्यातील दुसऱ्या जागेच्या बदल्यात दिली. याशिवाय ते चंद्रपूरचे विद्यमान अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना पक्षात सामावून घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, “गेल्या दोन महिन्यांपासून शरद पवार महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. लोकसभा निवडणुकीपासून ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : Morshi Melghat Assembly Constituency : मोर्शी, मेळघाटमध्ये महायुतीत उमेदवारीवरून पेच कायम
एनसीपीच्या (एसपी) अंतर्गत माहितीनुसार, विधानसभेची निवडणूक लढवण्यास अनेकजण इच्छुक होते. यासंदर्भात १,६०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. यासंदर्भात पक्षातील एका व्यक्तीने सांगितलं की, “आमच्या रणनीतीचा एक भाग म्हणून आमच्या पक्षाने सध्या सर्व उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. त्याऐवजी त्यांना उमेदवारी दाखल करण्यासाठी एबी फॉर्म सोपवले आहेत.” दरम्यान, काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर ८५-८५-८५ अशा फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्यांचं सांगितलं जातं. तसेच राहिलेल्या जागांवरही चर्चा होणार आहे. या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत होण्यास पवारांचाही महत्त्वाचा वाटा असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी जागावाटपासंदर्भात म्हटलं होतं की, “आम्ही (शिवसेना ठाकरे गट) शतकाच्या (१०० जागा) जवळ आलो आहोत. आम्ही दोन-चार षटकार मारले तर शतक पूर्ण करू. आम्ही ८५ वर पोहोचलो आहोत”, असं संजय राऊत गुरुवारी म्हणाले होते. दरम्यान, महाविकास आघाडीत मुळात जागावाटप करताना कोणाला किती जागा मिळणार याचा विचार न करता गुणवत्तेच्या आधारे जागा वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व जागा जाहीर झाल्यानंतर कोणता पक्ष किती जागा लढवत आहे हे लवकरच स्पष्ट होईल.