नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा असलेल्या नवी मुंबईत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा वाढलेला मतटक्का सध्या महायुतीच्या आणि विशेषत: भाजपच्या गोटात चिंतेचे कारण ठरु लागला आहे. भाजप नेते गणेश नाईक यांचे माजी खासदार पुत्र संजीव नाईक यांचे नाव चर्चेत असतानाही ऐनवेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालेली जागा, आगरी-कोळी समाजात असलेली नाराजी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आणि उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार समर्थकांच्या सोबतीला बहुजन, मुस्लिमांच्या एकवटलेल्या मतांमुळे बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या मतांमध्ये ५० हजारांपेक्षा वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा दोन लाखांहून अधिक मतांनी विजय झाला. ठाण्यातील ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा माजीवडा या तीन मतदारसंघात म्हस्के यांना दीड लाखांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले तर मिरा-भाईदरमध्येही त्यांचे विजयाचे अंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्यापेक्षा अधिक राहिले. नवी मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मतदान करणारे मतदार बहुसंख्येने आहेत. या भागातील बडे नेते गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामागे हे महत्वाचे कारण होते. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजन विचारे यांना नवी मुंबईतून ८२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यंदा मात्र म्हस्के यांचे मताधिक्य २२ हजारांपर्यंत खाली घसरले. नवी मुंबईत फारशी प्रतिकूल परिस्थिती नसतानाही म्हस्के यांना मताधिक्य मिळाल्याचा दावा महायुतीचे नेते करत असले तरी महाविकास आघाडीच्या वाढलेल्या मतदानाचा अभ्यास महायुतीच्या आणि विशेषत: भाजपच्या गोटात सुरु झाला आहे.

हेही वाचा – उमेदवारांचा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रप्रपंचाचा आधार, कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक

ऐरोलीत सर्वाधिक फटका

२०१९ च्या तुलनेत ऐरोली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मताधिक्य ३४ हजार ५६५ मतांनी तर कमी झालेच मात्र महाविकास आघाडीच्या एकूण मतांमध्ये ३६ हजार ५०७ मतांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मताधिक्य २०१९ च्या तुलनेत २७ हजार ३२१ मतांनी घटले आहे. येथे महाविकास आघाडीचा मते २७ हजार ३८४नी वाढली आहे. बेलापूरच्या तुलनेत ऐरोलीत महायुतीचा मतटक्का कमी झाल्याचे दिसते. २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला ऐरोलीतून ५५.२६ टक्के इतके मतदान झाले होते. महाविकास आघाडीला येथून ३२.४३ टक्के इतकी मते त्यावेळी मिळाली होती. २०२४ मध्ये ऐरोलीतून महाविकास आघाडीला ४५.०२ टक्के इतकी मते मिळाली असून महायुतीचा मतटक्का ४९.४३ टक्क्यांपर्यंत स्थिरावल्याचे पहायला मिळते. ऐरोलीतून २०१९ मध्ये ४५२ पैकी ३७७ बुथवर शिवसेना-भाजप युतीला मताधिक्य होते. यंदा ४३० बुथपैकी १८१ बुथवर महाविकास आघाडीला मताधिक्य असून महायुतीला २४९ ठिकाणी मताधिक्य मिळाले आहे. २०१९ च्या तुलनेत बुथनिहाय मतांमध्येही महाविकास आघाडीने बऱ्यापैकी यश मिळविल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – मुंबई पदवीधरमध्ये चुरशीची लढत

बेलापूरातही महाविकास आघाडीचा मतटक्का वाढला

२०१४ नंतर भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातही यंदा महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार टक्कर दिल्याचे पहायला मिळते. या मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना यंदा १२ हजाराचे मताधिक्य मिळाले असले तरी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत महायुतीचे मताधिक्य येथून २७ हजार ३२१ मतांनी घटले आहे. याठिकाणी महाविकास आघाडीची मते २०१९ च्या तुलनेत २७ हजार ३८४ मतांनी वाढली आहेत. या मतदारसंघात २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला ५६ टक्के तर तेव्हाच्या काँग्रेस आघाडीला ३४.४३ टक्के इतकी मते होती. यंदा मात्र महाविकास आघाडीला येथून ४४.६१ टक्के इतके मतदान झाले असून महायुतीचा मतटक्का ५०.६७ पर्यंत घसरला आहे. या मतदारसंघातील ३८० बुथपैकी १३८ बुथवर महाविकास आघाडीला मताधिक्य असून महायुतीला २४२ बुथवर मताधिक्य मिळाले आहे. २०१९ तुलनेत हे अंतरही बरेच मोठे आहे.