ठाणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण’ योजनेची अंमलबजावणी करत पात्र महिलांच्या खात्यात महिन्याला १५०० रुपये जमा केल्यानंतर राज्य सरकारने या ‘लाडक्या बहिणींना’ आचारसंहितेपुर्वी पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची स्वाक्षरी असलेले एक भावनिक पत्र या योजनेतील पात्र महिलांना पाठविण्याचे आदेश राज्य सरकारने राज्यातील जिल्हा प्रशासनाला धाडले असून आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वी हे पत्र घरोघरी पोहचविण्याची मोहीम जिल्हा स्तरावरुन सुरु करण्यात आली आहे.

‘प्रिय ताई, या मदतीच्या मोबदल्यात मला काही नको, तुझा कष्टाळू हात माझ्या डोक्यावर असू दे’ असे आवाहन या पत्रातून ‘लाडक्या बहिणींना’ करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये महाविकास आघाडीकडून पराभवाचे तोंड पहावे लागल्याने खडबडून जागे झालेल्या महायुती सरकारने गेल्या काही महिन्यांपासून विवीध सामाजिक योजनांचा रतीब मांडायला सुरुवात केली आहे. मध्य प्रदेश सरकारकडून राबविण्यात आलेल्या ‘लाडली बहेन’ योजनेशी मेळ साधणारी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण’ योजना राज्य सरकारने जाहीर केली आणि पात्र महिलांना प्रती महिना १५०० रुपये देण्यास सुरुवात केली. या योजनेचा निवडणुकांशी संबंध नसल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात असला तरी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना पात्र महिलांसाठी एक भावनिक पत्र तयार करुन सरकारने या आघाडीवर मतांचे गणित पक्के व्हावे असा प्रयत्न करुन पाहिल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : भाजपच्या छाननी समितीची नवी दिल्लीत बैठक; विधानसभा उमेदवार निश्चितीबाबत चर्चा

काय आहे पत्र ?

राज्य सरकारने ११ ॲाक्टोबर रोजी सर्व जिल्हाधिकारी यांच्यासाठी एक आदेश काढत लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्व महिलांना हे भावनिक पत्र तात्काळ पोहच करावे अशा सूचना दिल्या आहेत. या पत्राची सुरुवात ‘प्रिय ताई’ अशी करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून वर्षाला १८ हजार रुपये तुला मिळतील आणि राज्यातील एक कोटी ९६ लाखांपेक्षा भगिनिंना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे पत्रात म्हटले आहे. या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिलांना हा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात आला असून ‘माझ आयुष्य तुला समर्पित आहे, ताई तू सुखी व्हावीस हीच माझी इच्छा आहे’, असा मजकूर या पत्रात आहे. या पत्राचा शेवट भावनिक अंगाने करण्यात आला आहे. ‘ किती करतेस तू कुटुंबासाठी…तुझं आरोग्य, शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार यांना बळ देण्यासाठी तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी सदैव उभा राहील अशी ग्वाही देतो’ असे त्यात म्हटले आहे. ‘त्या बदल्यात मला काय हवय? काही नको. तुझा कष्टाळू कर्तबगार हात माझ्या डोक्यावर असू दे सदैव’ अशी भावनिक साद या पत्रातून बहिणींना घालण्यात आली आहे. या पत्राच्या शेवटी, तुझा भाऊ ‘एकनाथ’, ‘देवभाऊ’, ‘अजितदादा’ आणि बहिण ‘आदिती’ अशा चौघांची स्वाक्षरी आहे.