मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना आणि मराठा आरक्षणाचा वादामुळे कोंडीत सापडलेल्या महायुती सरकारने गेल्या काही दिवसांपासून राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याचा, अनावरणाचा सपाटा लावला आहे. सत्ताधारी पक्षाप्रमाणे विरोधकांकडूनही विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले जात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक गेल्या कित्येक वर्षांपासून रखडले आहे. त्याबद्दल मूग गिळून गप्प बसलेल्या राज्यातील सर्वपक्षीय राजकारण्यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र शिवप्रेमाचे चांगलेच भरते आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर डिसेंबर २०२३मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा ३५ फूट उंच पुतळा २६ ऑगस्ट रोजी हा पुतळा कोसळला. या घटनेबद्दल पंतप्रधानांना माफी मागावी लागली. याच ठिकाणी नव्याने शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
हेही वाचा >>> ठाणे, बदलापुरात गोंधळ; ठाण्यात प्रक्रियेवर आक्षेप, तर निरीक्षकांसमोरच बदलापुरात वाद
राजकोट येथील दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वपक्षीय राजकारण्यांनी राज्यभरात शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याचा आणि या पुतळ्यांच्या अनावरणाचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या ३२ फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले होते. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघात हा पुतळा उभारण्यात आला आहे. दोन आठवड्यांपूर्वी शिंदे यांनी बुलढाणा शहरात उभारण्यात आलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ यांचा १५ फूट व त्यासह बालशिवाजी यांचा नऊ फूट उंचीचा पंचधातूच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले होेते. तर गेल्याच आठवड्यात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नांदे येथे उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते पार पडले. काही दिवसांपूर्वी मिरा-भाईंदरमध्ये शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते.
राहुल गांधी यांच्या हस्ते आज अनावरण
लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या हस्ते होणार आहे. तर शनिवारी संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
रोहा येथे कुंडलिका नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले. या वेळी छत्रपती संभाजी राजे, रघोजी राजे आंग्रे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. हा पुतळा ब्रॉन्झ धातूने बनवण्यात आला असून निर्मिती शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी केली आहे.
पंचतारांकित वाटाघाटीमहाविकास आघाडी
आणि महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. चर्चेच्या वाटाघाटी सुरूच आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चर्चा सध्या दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांमध्ये होतात. शिवसेनेमुळे (ठाकरे) पंचतारांकित हॉटेलांमध्ये दिवसभर चर्चेसाठी जागा उपलब्ध होते. काँग्रेस व राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते वाटाघाटी लांबल्या तरी खुशीत असतात. दोन-तीन आठवडे आमच्यामुळे पंचतारांकित हॉटेलात चर्चा झाल्या. ‘आता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा म्हणता तर तुम्हीच आता पुढाकार घ्या’, असे शिवसेनेच्या एका नेत्याने हळूच पिल्लू सोडून दिले. त्यावर काँग्रेसची ऐपत टिळक भवनात वाटाघाटी करण्यापुरती असल्याचे उत्तर देण्यात आले. टिळक भवनाच्या उपहारगृहातील पोहे व भजी वगळता फार काही मिळणार नाही हे पण या नेत्याने सांगून टाकले. पुढच्या टप्प्यात पंचतारांकित वाटाघाटी होणार की टिळक भवनात गाठीभेटी होणार याची उत्सुकता असेल.