कोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान सोहळा शासकीय स्वरूपाचा असताना या संधीचा फायदा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापासून महायुतीच्या तमाम नेत्यांनी योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांचा परखड समाचार घेत या कार्यक्रमाचे स्वरूप राजकीय रंगमंचात रुपांतरीत केले.. भाषणाची एकूण धाटणी ही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकी थाटाची राहिली. विशेष म्हणजे राज्य शासनाच्या कार्यक्रमात विरोधकांना कोणतेच स्थान दिलेले नव्हते. किंबहुना त्यांना टीकेच्या तोंडी देण्याचे काम सतत होत राहिले.
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर झाली असून लाभार्थ्यांच्या खात्यात दोन महिन्याचे पैसेही जमा झाले आहेत. योजना कागदावरची नाही तर प्रत्यक्षात राबवणारी असल्याचे राज्य शासनाने कृतीने दाखवून दिले आहे. मध्यप्रदेश मधील लाडली बहन योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महिलांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ही योजना फायदेशीर ठरेल, असा महायुतीचा कयास आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. त्याची कसर भरून काढण्यासाठी महायुतीकडून काही पावले टाकले जात आहेत. या नियोजनात लाडकी बहीण हा महत्त्वाचा भाग बनवण्याचे महायुतीचे धोरण आहे. त्यामुळे या योजनेचा एका बाजूला शासकीय पातळीवरून जाहिरातबाजी द्वारा प्रचाराचा धडाका उडवला जात असताना महायुतीच्या राजकीय मंचावरून याच योजनेचे महत्त्व पटवून देण्याला प्राधान्य दिले जात आहे.
हेही वाचा…सांगलीच्या आमदाकीवरून भाजप, काँग्रेसमधील गणिते बिघडणार ?
कोल्हापुरात लाडकी लेक योजना सन्मान सोहळा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. सरकारी योजना असल्याने शासन यंत्रणेचा पुरेपूर वापर करीत समारंभस्थळी महिलांची मोठी गर्दी जमवण्यात आली होती. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर पुष्पवृष्टी करीत रक्षाबंधन करून भगिनींनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. शासकीय कार्यक्रमात सर्वांची भाषणेही या योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांचा सडकून समाचार घेणारी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. या योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा, असे टोकाचे विधान केले. राज्याचे मुख्यमंत्रीच जोडा दाखवण्यासारखी भाषा शासकीय कार्यक्रमात करीत असतील तर सार्वजनिक ठिकाणच्या सभ्यतेचे काय करायचे असा प्रश्न उपस्थित झाला. त्याला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी जोरकस प्रत्युत्तर देताना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जोडा दाखवलेल्या अशी भाषा करू , असे ऐकवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लाडकी बहीण योजना रद्द करण्यासाठी न्यायालयात जाणारे विरोधक संवेदनशून्य असल्याची जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या गैरसमज, अविश्वासाला बळी पडू नका, असे आवाहन केले. याचवेळी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या; पण मतांचा आशीर्वाद द्या, असे सांगण्यास एकही वक्ता विसरला नाही.
हेही वाचा…मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांच्या भूमिकेने महाविकास आघाडीतील तिढा वाढला
विरोधकांचा विसर
बदलापूर घटनेचा प्रभावही या कार्यक्रमात दिसला. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्यासाठी शासनाचे प्रयत्न कसे सुरु आहेत हे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगत राहीले. लाडकी बहीण सन्मान सोहळा हा शासनाचा कार्यक्रम असताना त्याची नेपथ्य रचना राजकीय प्रचारकी थाटाची ठेवण्यात आली. सभा मंचावर लावण्यात आलेल्या फलकावर केवळ महायुतीच्याच खासदार , आमदारांचा नामोल्लेख, छबी होत्या. विरोधी पक्षातील खासदार, आमदारांना त्यातून पूर्णतः टाळण्यात आले होते. कार्यक्रमातून निवडणूक प्रचाराला पूरक मुद्दे पुढे कसे येतील याची पुरेपूर दक्षता घेतली होती.