नाशिक – शहरासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी परस्पर उमेदवारी जाहीर करण्याची एकच चढाओढ लागल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत वितुष्ट निर्माण झाले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपला विचारात न घेता दिंडोरीत नरहरी झिरवळांचे नाव राष्ट्रवादी अजित पवार गटाने परस्पर जाहीर केले. त्यावर भाजपने आक्षेप घेतला. दुसरीकडे, महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शरद पवार गटाने हक्क सांगितलेल्या जागांवर शिवसेना ठाकरे गटाने थेट उमेदवारांच्या नावांचे ठराव केले. यामुळे काँग्रेसमधून नाराजी व्यक्त होत असताना शरद पवार गटाने जिल्ह्यातील सर्व १५ जागांवरच ठाकरे गटाने उमेदवार घोषित करावेत, असा उपरोधिक सल्ला दिल्याने महाविकास आघाडीतील बेबनाव उघड झाला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांची घाऊक पक्षांतरे झाली. यामुळे जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघात वेगवेगळी समीकरणे आकारास येत आहेत. सध्या अजित पवार गटाकडे सहा, भाजपकडे चार, शिंदे गटाकडे दोन, काँग्रेस आणि एमआयएमकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे. यातील अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे अलीकडेच नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. यावेळी त्यांनी महायुतीत जागा वाटपासाठी समन्वय समिती स्थापन झाल्याची माहिती दिली. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिंडोरीतील मेळाव्यात नरहरी झिरवळ हेच विधानसभेचे उमेदवार असल्याची घोषणा केली. या जागेवर शिंदे गटाने माजी आमदार धनराज महालेंना पक्ष प्रवेशावेळी शब्द दिला होता. त्यांनीही कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असल्याचे सूचित केले. परस्पर उमेदवारी जाहीर करण्याच्या कृतीवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी प्रगट केली. नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत असेच झाले होते. शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत कुणी घोषणा करू नये. महायुतीतील पक्षांनी शिष्टाचार पाळावा, असा सल्ला महाजनांनी अजित पवार गटाला दिला. दिंडोरीच्या जागेवरून महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीत विधानसभेच्या जागांवरून कुरघोडीचे खेळ रंगत आहेत. मागील निवडणुकीत ज्या जागेवर मित्रपक्षाचा उमेदवार द्वितीयस्थानी होता, त्याही जागांवर ठाकरे गटाचा डोळा आहे. यातून शिवसैनिकांच्या मेळाव्यात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात माजी आमदार वसंत गिते आणि नाशिक पश्चिममधून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांंच्या उमेदवारीचे ठराव झाले. नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व या दोन्ही मतदारसंघात परंपरागत मतदारांचा दाखला देऊन काँँग्रेसने आधीच दावा केला आहे. पक्षाने सर्व मतदारसंघात इच्छुकांकडून अर्ज मागवले. नाशिक मध्य मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील दुसऱ्या क्रमांकावर होत्या. या जागेसाठी काँग्रेस आग्रही असताना ठाकरे गटाने परस्पर उमेदवाराचा ठराव केल्यामुळे काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटली.
हेही वाचा – शेकाप प्रमुखांच्या कुटुंबात उमेदवारीवरून कलह, दोन भावांमध्ये बाचाबाची
नाशिक पश्चिममध्ये ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्यामुळे शरद पवार गटाची कोंडी झाली. ठाकरे गटाला शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपरोधिकपणे, ठाकरे गटाने एकतर्फी उमेदवारी जाहीर करून स्वत:चे हसे करून घेतले असून खरेतर संपूर्ण जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद असल्याचे मांडले. त्यांच्याकडे सर्व मतदारसंघात मातब्बर उमेदवारांची रांग लागली असताना त्यांनी दोन जागांची घोषणा करणे म्हणजे ठाकरे गटावर नामुष्की आहे. ती टाळण्यासाठी ठाकरे गटाने सर्व जागांवर उमेदवार घोषित करावेत, आम्ही त्यांचे झेंडे हाती घेत प्रचार करू, असा टोला शरद पवार गटाने हाणला. विधानसभेच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठीचा संघर्ष अटीतटीचे स्वरुप धारण करत आहे.
© The Indian Express (P) Ltd