नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह महायुतीच्या आमदारांनी संघाच्या रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र रेशीमबागेत येण्याचे टाळले.
नागपुरात होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान भाजपचे आमदार दरवर्षी स्मृती मंदिर परिसराला भेट देत असतात. त्यानुसार गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजप व शिंदे गटाच्या आमदारांनी आद्या सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर आठच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचले. त्यानंतर महर्षी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सहसंघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया यांच्या उपस्थितीत सर्व सदस्यांचा परिचय झाल्यानंतर श्रीधर गाडगे यांनी सर्व सदस्यांना मागदर्शन केले.
हेही वाचा >>>चार मंत्री असलेल्या सातारा जिल्ह्यात पालकमंत्री पदासाठी रस्सीखेंच
पंकजा मुंडेही अनुपस्थित
स्मृती मंदिर परिसराला भाजपसह शिंदे गटाच्या बहुतांश आमदारांनी भेट दिली. मात्र भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह शिंदे गटाचे नीलेश राणे, भरतशेठ गोगावले यांनी दांडी मारल्याची चर्चा परिसरात रंगली होती. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे २० आमदार व शिंदे गटाचे १० आमदार स्मृती मंदिराकडे फिरकले नाहीत.
लहानपणापासूनच संघ स्वयंसेवक शिंदे
समाजात निरपेक्ष भावनेने काम कसे करावे हे संघ परिवाराकडून आम्ही शिकलो. लहानपणी संघ शाखेत जात होतो. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीतून आमच्यावर संस्कार झाले. स्मृती मंदिर परिसर आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
हेही वाचा >>>राम शिंदे यांच्या निवडीने जिल्ह्यात सत्ता समतोलाचा भाजपचा प्रयत्न
अजित पवारांच्या दोन आमदारांची हजेरी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य स्मृती मंदिर परिसराला भेट देतील की नाही, याबाबत अनिश्चितता होती. यापूर्वी अजित पवार कधीच स्मृती मंदिर परिसरात आले नसल्यामुळे आज ते येतात का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर अजित पवार पोहचले नाहीत. मात्र त्यांच्या पक्षाचे दोन आमदार राजू कारेमोरे आणि राजकुमार बडोले यांनी हजेरी लावली. याबाबत राजू कारेमोरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, आम्हाला पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांकडून स्मृती मंदिर परिसरात जाऊ नये अशी कुठलीही सूचना नव्हती.