मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची महायुतीला घाई नाही, असे प्रतिपादन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी येथे केले. महायुतीतील पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांच्या विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यात चुकीचे काहीच नसून हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे, असे देसाई यांनी नमूद केले. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील समन्वयकांची नावे महायुतीकडून बुधवारी जाहीर करण्यात आली.
महायुतीतील नेते देसाई, भाजप आमदार प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी नेत्यांनी महायुतीतील जागावाटप, समन्वय आणि अन्य मुद्द्यांवर पत्रकारपरिषदेत भूमिका मांडली. आमच्यात कोणतेही मतभेद नसून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची घाई उद्धव ठाकरे गटाला आहे. मात्र आम्हाला ती नाही. महायुतीतील वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपद आणि जागावाटपाबाबत निर्णय घेतील, असे देसाई यांनी सांगितले. महायुतीतील नेत्यांनी एकमेकांच्या जागेवर उमेदवारी मागितली, की महायुतीत धुसफूस अशा बातम्या प्रसिद्धीमाध्यमांमधून येतात. पण आपली इच्छा पक्षाच्या नेत्यांकडे किंवा जाहीरपणे व्यक्त करण्यात काहीही गैर नाही, असेही देसाई या वेळी म्हणाले.
© The Indian Express (P) Ltd