Sharad Pawar on Mahayuti schemes: लाडकी बहीण या योजनेमुळे लोकसभेनंतर महाविकास आघाडीला जी गती मिळाली होती, त्यावर काही प्रमाणात अंकुश लागला. पण, राज्यातील जनतेला बदल हवा आहे. त्यामुळे महायुतीचा पराभव होऊन मविआ बहुमताने सरकार स्थापन करील, असा विश्वास शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केला. दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. लोकसभेत महायुतीमधील घटक पक्षांची जबरदस्त पीछेहाट झाल्यानंतर राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’सारखी योजना आणली होती.
दी इंडियेन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार म्हणाले, “लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकारने सर्व यंत्रणा वापरून लोकप्रिय योजनांची घोषणा केली. ‘माझी लाडकी बहीण’सारखी योजना आणून, त्यांनी वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. आमचे सहकारी म्हणतात त्याप्रमाणे या योजनेचा थोडाबहुत परिणाम होईल.”
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला होता. राज्यातील ४८ पैकी केवळ १७ लोकसभा मतदारसंघांत महायुतीचा विजय झाला होता; तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या होत्या. विविध योजनांची घोषणा केल्यामुळे महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्ता मिळविता येईल का, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, “माझ्या अंदाजानुसार लोकांना बदल हवा आहे. लोकांची ही भावना कायम राहिल्यास महाविकास आघाडी स्पष्ट बहुमत मिळवून विजय प्राप्त करील.”
हे वाचा >> ‘ते ठाकरे असतील तर मी राऊत’, राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर
८३ वर्षीय शरद पवार सध्या मराठवाड्यातील प्रचारात गुंतलेले असून, ते राज्यभर प्रवास करीत आहेत. १९९९ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. मात्र, २०२३ साली अजित पवार यांनी पक्षातून बाहेर पडून स्वतःचा वेगळा गट स्थापन करीत पक्षावरच दावा ठोकला. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर आयोगाने अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष असल्याचे मान्य केले.
सुप्रिया सुळेंच्या पतीला प्राप्तिकर विभागाची नोटीस
शरद पवार मुलाखतीत पुढे म्हणाले, “आमच्याविरोधात पैसा आणि यंत्रणेचा वापर झाला. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझी मुलगी सुप्रिया सुळे चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आली आहे. ती जेव्हा जेव्हा सरकारवर आक्रमक टीका करते, तेव्हा तेव्हा तिचे पती सदानंद सुळे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस येते. एवढेच नाही, तर माझे बंधू (दिवंगत अनंतराव पवार) यांच्या मुलींनाही (अजित पवारांच्या भगिनी) अशाच प्रकारे त्रास दिला गेला. केंद्र सरकारने माझ्या कुटुंबाविरोधात यंत्रणेचा गैरवापर केला. हे असे याआधी घडलेले आम्ही कधीच पाहिले नव्हते.”
हे ही वाचा >> ‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयावर समाधान
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याबाबत शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले. जरांगे पाटील यांनी समंजस भूमिका घेतली असून, त्याचा लाभ निश्चितच विरोधकांना होईल, असेही शरद पवार म्हणाले. “मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी करतानाच मुस्लीम आणि धनगर समाजाच्या आरक्षणालाही पाठिंबा दिला आहे. याचा अर्थ ते आपला जनाधार आणखी व्यापक करीत आहेत. ते ओबीसींच्या विरोधात नाहीत, हा संदेश त्यामुळे जनतेमध्ये जात आहे”, असे सांगून मराठा आणि ओबीसी असा कोणताही वाद नसल्याचे शरद पवार म्हणाले.