नगर : मुख्यमंत्री पदाची प्रत्येकाची राजकीय इच्छाशक्ती व महत्त्वाकांक्षा असते हे खरेच आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री कोण याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. भावी मुख्यमंत्र्यांची संख्याही वाढली आहे. परंतु महायुतीने आमची चिंता करण्यापेक्षा त्यांचा भावी विरोधी पक्षनेता कोण, याची चिंता करावी, असा टोला काँग्रेसचे माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

श्रीरामपूर येथे आमदार लहू कानडे यांनी आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्य सरकारच्या धोरणावर टीका करताना आमदार थोरात म्हणाले, सध्या महायुतीकडून राज्याची लूट चालू आहे. रोज शेकडो अध्यादेश काढले जात आहेत. रोज रात्रंदिवस सर्वत्र छपाई सुरू आहे. राज्यामध्ये माणसे उपाशी आहेत, रस्ते धड नाहीत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, पुरेशी वीज नाही, शाळांना शिक्षक नाहीत, एसटी खिळखिळी झाली आहे, त्या बदलल्या पाहिजेत, असे असताना जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च केला जात आहे. चार दिवसांवर आचारसंहिता आली तरीही समाज माध्यमांसाठी हजारो कोटी रुपयांची कंत्राटे काढली जात आहेत. राज्याची तिजोरी खिळखिळी केली जात असून तिची सर्रासपणे लूट सुरू आहे. त्यामुळे जनता सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशीही टीका आमदार थोरात यांनी केली.

हेही वाचा : Ratan Tata: नरेंद्र मोदी ते मोहन भागवत; सर्वपक्षीय पुढाऱ्यांशी संबंध असूनही रतन टाटा राजकारणापासून अलिप्त कसे राहिले?

अजित पवार महायुतीला बोजड

अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी महायुतीला बोजड झाली आहे. अजित पवार खटपटीचे राजकरण करतात. भविष्यात बघू काय काय होते, असेही भाष्य आमदार थोरात यांनी केले.