नाशिक – आरक्षणाचे निमित्त करुन प्रत्येक समाज रस्त्यावर उतरण्याची भाषा करीत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी महायुतीपुढे सध्यातरी कोणालाही न दुखविता सर्वांना थोपवून धरण्याची कसरत करावी लागत आहे. सरकार एकालाच झुकते माप देत असल्याचा संदेश इतर समाजांमध्ये जाऊ नये, यासाठी सर्वांच्या ताटात काही ना काही पडेल, याची काळजी महायुती घेत असल्याचे नाशिक येथे एकाच दिवशी आयोजित विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अधोरेखित झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाचा लढा चालू आहे. दुसरीकडे, मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळू नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांसह इतरांच्या नेतृत्वाखाली ओबीसींचा संघर्ष आहे. धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण हवे आहे. त्यास आदिवासी समाजाचा विरोध आहे. आरक्षणाच्या नावाने संपूर्ण समाज विभागला जात असल्याने सत्ताधाऱ्यांपुढील समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत सर्वांना सरकार काहीतरी देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संदेश जाणे गरजेचे असल्याने नाशिकमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमांची मांडणीही तशीच करण्यात आली होती.

हेही वाचा >>>महायुतीचा विरोधी पक्षनेता कोण हे फडणवीस यांनी ठरवावे’; बाळासाहेब थोरात यांना १८० जागा जिंकण्याचा विश्वास

ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिक महानगरपालिकेतर्फे मुंबई नाका येथे साकारण्यात आलेल्या महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त माळी समाजाचे म्हणजेच ओबीसींचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी आपल्या भाषणांमध्ये महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करताना सामाजिक समतेचा पाया या मुद्यावर विशेष भर दिला. बदलत्या सामाजिक परिस्थितीत त्यांना सामाजिक समता किती महत्वाची आहे, हे ठसविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यानंतर नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथी) विभागीय कार्यालय, अभ्यासिका, विद्यार्थी वसतिगृहाच्या भूमिपूजनाव्दारे मराठा समाज तसेच धनगर समाजाताली विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, कार्यालय इमारतीचे भूमिपूजन अशी कामे झाली. माळी, धनगर, मराठा असा वेगवेगळ्या समाजांना विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून न्याय देण्याचा सरकारतर्फे प्रयत्न करण्यात आला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti social outreach through various programs in nashik print politics news amy