ठाणे : ठाणे लोकसभेची जागा कुणाच्या पारड्यात पडणार आणि येथून कोण उमेदवार असणार याविषयी महायुतीत शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीत संभ्रमाचे वातावरण असताना ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईदर या प्रमुख शहरांमध्ये शिवसेना-भाजप नेत्यांमधील धुसफूस टोकाला पोहचल्याने या पक्षातील नेत्यांमधील मतभेद मिटविण्याचे मोठे आव्हान या पक्षाच्या नेत्यांना पेलावे लागणार आहे. ठाण्यात शिवसेनेकडून डावलले जात असल्याचा आरोप करत भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर यांनी बुधवारी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत पक्षातील एका मोठया गटात असलेल्या असंतोषाला वाट मोकळी करुन दिली. नवी मुंबईत भाजप नेते गणेश नाईक आणि मुख्यमंत्री समर्थकांमधील वाद दिवसागणिक चिघळत असल्याचे चित्र असून मिरा-भाईदरमध्ये भाजपचे प्रमुख नरेंद्र मेहता आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एकमेकांवर व्यक्तीगत स्वरुपाची चिखलफेक सुरु केल्याने ठाण्याच्या गडातील हा दुभंग मिटवायचा तरी कसा असा प्रश्न या पक्षांत्या नेत्यांपुढे असणार आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणावर बदलली आहेत. मतदारसंघांच्या पुर्नरचनेनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत (२००९) या मतदारसंघात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या तिकीटावर संजीव नाईक यांनी बाजी मारली होती. या मतदारसंघात चुकीचा उमेदवार दिल्याचा मोठा फटका तेव्हा शिवसेनेला बसला होता. २०१४ मध्ये मात्र शिवसेनेने ही चुक सुधारली आणि भाजपच्या साथीने या मतदारसंघात मोठा विजय मिळवला. असे असले तरी नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना मोठा फायदा झाल्याचे दोन्ही निवडणुकांमध्ये दिसून आले. २०१४ मध्ये दोन लाख ८१ हजार तर २०१९ मध्ये चार लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने राजन विचारे यांनी विजय मिळविला. मोदी लाटेमुळे विचारे यांना इतके मोठे मताधिक्य मिळाल्याचे स्पष्टच होते. ठाण्यात शिवसेनेची मोठी ताकद असली तरी नवी मुंबई, मिरा-भाईदर या दोन्ही शहरांमध्ये भाजपला मानणारा एक मोठा नव मतदार गेल्या काही वर्षात तयार झाला आहे. नवी मुंबई, मिरा-भाईदर तसेच ठाण्यातील घोडबंदरचा मोठा पट्टा हा बहुभाषिक लोकसंख्येचा असून नवभाजपप्रेमी मतदारांची संख्या या भागात मोठी आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सोडला जावा यासाठी या पक्षाचे नेते आग्रही आहेत.
हेही वाचा : हातकणंगलेत राजू शेट्टी स्वबळावर, तिरंगी लढत अटळ
वादाची फोडणी, वितुष्टाची किनार
पक्षाची ताकद सतत वाढत असूनही शिवसेनेकडून डावलले जात असल्याची बोच ठाण्यातील भाजप नेत्यांच्या मनात आहे. मोदी यांच्या राजवटीत संपूर्ण देशभरात पक्ष वाढत असताना ठाण्यात मात्र युतीच्या गणितात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांपुढे वाकून रहाणे भाजपच्या स्थानिक नेत्यांना आता मान्य नाही. त्यामुळे या दोन पक्षातील नेत्यांमध्ये वरचेवर खटके उडत असून ठाणे शहरातील पक्षाचे आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेला दिलेले आव्हान हे याच नाराजीचे प्रतिक मानले जात आहे. ‘यापुर्वी झाले ते झाले यापुढे असा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही आणि त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील’ अशा शब्दात आमदार केळकर यांनी शिवसेनेला दिलेल्या आव्हानाचे मोठे पडसाद आता दोन्ही पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात उमटू लागले आहेत.
हेही वाचा : सुनील देवधर यांना पुण्यातील उमेदवारीत का डावलले ?
गणेश नाईक, शिंदेसेनेत वितुष्ट टोकाला
ठाण्यात शिवसेनेच्या कार्यपद्धतीविषयी भाजप नेते जाहीरपणे बोलू लागले असतानाच नवी मुंबईत भाजप नेते गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील वितुष्ट दिवसागणिक वाढू लागले आहे. दिघा येथील एका शाळेच्या उद्धाटन कार्यक्रमासाठी आलेल्या गणेश नाईकांना या भागातील शिवसेना नेत्यांनी काळे झेंडे दाखविले. त्यामुळे संतप्त झालेल्या नाईकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचा उल्लेख थेट ‘रावण’ असा केला. त्यावर चौगुले यांनीही नवी मुंबईचा सातबारा कुणाच्या नावावर लिहलेला नाही या शब्दात नाईकांवर पलटवार केला. महायुतीत ही जागा कुणाच्याही पारड्यात गेली तरी या दोन पक्षातील स्थानिक पातळीवरील नाराजीचे प्रतिबिंब मात्र उमटल्याशिवाय रहाणार नाही अशीच चर्चा आहे.
सरनाईक विरुद्ध मेहता
मिरा-भाईदर ही दोन्ही शहरे महायुतीसाठी पोषक मानली जातात. या भागात जैन आणि गुजराती समाजाचा मोठा भरणा असल्याने येथे नरेंद्र मोदी यांच्या उमेदवाराला मतांचे मोठे दान मिळते असा दोन निवडणुकांमधील अनुभव आहे. असे असले तरी भाजपचे स्थानिक नेते नरेंद्र मेहता आणि ओवळा-माजीवड्याचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यातील मतभेदांमुळे येथेही भाजप विरुद्ध शिवसेना असा उघड संघर्ष सुरु असल्याचे चित्र कायम आहे.
हेही वाचा : राज्यातील भाजपच्या २० पैकी सात उमेदवारांची पार्श्वभूमी घराणेशाहीची !
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविणे हे एकमेव उद्दीष्ट महायुतीने समोर ठेवले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आम्ही काम करु.
विजय चौगुले, जिल्हाप्रमुख शिवसेना नवी मुंबई
शिवसेना नेत्यांच्या ठराविक वागण्याची आम्हाला जुनी सवय आहे. मात्र महायुतीच्या राजकारणात एकमेकांचा आदर सर्वानिच राखायला हवा.
संजय केळकर, आमदार भाजप