नाशिक – विभागातील पाच जिल्ह्यांत महायुतीसाठी १६ मतदारसंघ नाजूक स्थितीत असल्याचा निष्कर्ष भाजप नेतृत्वाने अभ्यासाअंती काढला आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदान आणि अन्य काही निकषांच्या आधारे हे मतदारसंघ ‘ब’ गटात समाविष्ट करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीत विभागात महायुतीने ४२ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असून कमकुवत मतदारसंघात काय मशागत करावी लागेल, याची माहिती भाजपच्या सुकाणू समितीकडून मागविण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नाशिक येथे नुकतीच भाजपच्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय सुकाणू समितीची बैठक झाली. या समितीत नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यातील ३० सदस्यांचा समावेश आहे. यावेळी सर्व मतदारसंघांसह कमकुवत जागांविषयी शहा यांनी चर्चा केल्याचे काही सदस्यांकडून सांगण्यात आले. नाशिक विभागात सद्यस्थितीत ४७ पैकी ३४ विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात असून ही संख्या ४२ वर नेण्याचे लक्ष्य त्यांनी दिले आहे. विभागातील सर्व मतदारसंघांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत महायुतीला मताधिक्य असलेले मतदारसंघ ‘अ’ गटात आहेत. ते मजबूत मानले जातात. विरोधकांना आघाडी मिळालेल्या मतदारसंघांचा समावेश कमकुवत म्हणजे ’ब‘ गटात करण्यात आल्याचे सदस्य सांगतात.

हेही वाचा >>> महायुतीला अजित पवार नकोसे? देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ विधानामुळे चर्चांना उधाण

लोकसभेवेळी विभागात महायुतीचे उमेदवार १३ विधानसभा मतदारसंघात कमी-अधिक फरकाने मागे राहिले होते. यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, निफाड, येवला, सिन्नर, देवळाली, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य अशा आठ मतदारसंघांचा समावेश आहे. नंदुरबारमधील तळोदा, धुळ्यातील शिंदखेडा आणि साक्री तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुती मागे होती. अन्य तीन मतदारसंघही याच गटात असले तरी त्यांची स्पष्टता झालेली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या गटातील १६ मतदारसंघात सुक्ष्म पातळीवर काम करण्याची सुचना केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी केली. या सर्व जागा जिंकण्यासाठी स्थानिक पातळीवर काय करणे आवश्यक आहे, याचा अहवाल सदस्यांना सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>> अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये शहराध्यक्ष मिळेना

‘त्या’ मतदारसंघांमध्ये अधिक परिश्रम

वर्गवारीनुसार ब गटात समाविष्ट विधानसभा मतदारसंघात विजयासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत. त्यात भाजप लोकसभेत मागे राहिलेल्या १३ जागांचाही समावेश असल्याचे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लोकसभेतील स्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांचेही चार गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. जिथे सर्वात कमी वा त्याहून काहिसे अधिक मतदान झाले, त्या भागात घरोघरी भेट देत मतांची टक्केवारी किमान किमान दुपटीने वाढविण्याचा कार्यक्रम देण्यात आला. या भागात वैयक्तिक संपर्क, विविध समाज घटक, प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेटी, महिला व शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. …