नवी मुंबई : यंदाची विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र राज्याची निवडणूक नाही तर देशाची निवडणूक असेल. तसेच ही निवडणूक पुढच्या १५ वर्षांच्या राजकारणाची दिशा ठरवणारी असेल, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी नवी मुंबईतील कार्यकर्ता संवाद बैठकीत मेळाव्यात बोलताना केले. २०२४ ला राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री असेल तर २०२९ ला भाजपचा मुख्यमंत्री असेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे मंगळवारी भाजपने कोकण आणि ठाणे कार्यकर्ता संवाद बैठकीत आयोजित केली होती. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बूथ स्तरावर काम करण्याचे आदेश दिले. ज्या भागात पक्षाचा प्रभाव आहे, त्या भागात अधिक दहा टक्के मते कशी मिळतील आणि ज्या भागात कमी मतदान आहे, त्या भागात दहा टक्के अधिक मते कशी मिळतील या दृष्टिकोनातून काम करा, अशा सूचना शहा यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. कारण, देशातील कोणत्याही राज्यात गेलो की तिथे महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकांविषयी विचारले जाते. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रमध्ये कमी जागा मिळाल्या. त्यामुळे इथे विरोधक प्रबळ असल्याचे चित्र होते. तसेच लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटाक्यांमुळे राज्यात सत्ता येणार नाही, असे चित्र सुरुवातीला दिसत होते. पण, आतापर्यत केलेल्या दौऱ्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
महिलांनाही महत्त्वाचे स्थान
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरावर अधिक लक्ष देऊन काम करण्यासाठी योजना आखली आहे. यात महिलांनाही महत्त्वाचे स्थान दिले जाणार आहे. प्रत्येक बुथवर ५० युवक नेमले जाणार आहेत. हे सर्वजण राहुल गांधी यांचा खरा चेहरा लोकांपर्यंत नेण्याचे काम करणार आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले.
सुरक्षेच्या कारणास्तव संघ कार्यालयाची भेट टाळली
कौपरखैरणे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जाणार होते. तिथे ते संघ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेणार होते. परंतु अतिशय दाटीवाटीचा भाग असलेल्या कौपरखैरणे भागात संघाचे कार्यालय आहे, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जाऊ नये, असे सुरक्षा यंत्रणांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी संघ कार्यालयात जाणे टाळले.
© The Indian Express (P) Ltd