दिगंबर शिंदे
सांंगली : बापजाद्याकडून वारसा हक्काने मिळालेल्या शेतीत हातातोडांची गाठ पडेलच याची खात्री नव्हती. म्हणून, चार घास सुखाचे मिळावेत यासाठी यांत्रिकी शिक्षणात पदविका घेऊनही रोजगाराच्या स्पर्धेत मागे पडत असल्याची खंत होती. अशातच पत्रकारितेमध्ये करिअर करायचे असे ठरवूनही पुन्हा शेती आणि तिच्या प्रश्नांनी चळवळीचा रस्ता पकडायला भाग पाडले. आज शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकरी चळवळीत ‘स्वाभिमानी’ची ढाल होत रस्त्यावरची लढाई लढत असलेला ४८ वर्षांचा युवा योध्दा म्हणजे तासगाव तालुक्यातील मांजर्डे या खेड्यातील महेश खराडे.
हेही वाचा… विनोद भिवा निकोले: स्वयंरोजगाराकडून राजकारणाकडे वाटचाल
पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखानदारांकडून कसे नागविले जाते, त्यांच्या घामाचा लिलाव मांडून कसे लुबाडले जाते याची आकडेवारीसह माहिती तोंडपाठ असलेल्या खराडे यांना शेतीचे बाळकडून जन्मत:च मिळालेले. शेती, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांची जाणीव अगदी न कळत्या वयापासून असल्याने पोटतिडकीने प्रश्न मांडण्याची त्यांची भाषा शिवराळ नसली तरी शिक्षणाच्या पुस्तकातून तावून सुलाखून आलेली आहे. अभियांत्रिकी पदविका असूनही नोकरीच्या बाजारात फारसे करण्यासारखे नाही, हे लक्षात आल्यावर राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेऊन प्राध्यापकी मिळते का, यासाठी काही काळ प्रयत्न केले. जिल्ह्याच्या ठिकाणी काही काळ पत्रकारिता केली. या वेळी राजकारणातील दुसरी बाजूही जवळून पाहता आली. राजकीय क्षेत्राकडून शेतीचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतीलच याची खात्री वाटली नाही. सर्वच राजकीय पक्ष एकमेकांना सहकार्य करीत जिल्हा बँक असो वा बाजार समितीत एकाच पंगतीला बसतात हे स्वत:च्या नजरेने पाहिले. या साऱ्याला कंटाळूनच त्यांनी शेतकरी चळवळीतून समाजकारण आणि पुढे त्यातून जमल्यास राजकारणाची दिशा पकडली.
हेही वाचा… वसंत मोरे : जनतेच्या मनातील नेता
शेतीतले प्रश्न, अस्थिर बाजारभाव, दलालांकडून होणारी लूटमार, नव्या धोणांचा शेतीवर होणारा परिणाम असे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यास त्यांनी सुरुवात केली. मग उसाच्या एफआरपीचा मुद्दा असो, अतिवृष्टीने वाया गेलेल्या पिकाबद्दलची ओरड किंवा द्राक्ष-बेदाणा-हळदीतील व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक… अशा अनेक प्रश्नांवर आंदोलनाची कास पकडून खराडे यांनी सांगलीच्या ग्रामीण भागात आज स्वत:चे नेतृत्व उभे केले आहे. यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदावर त्यांनी झेप घेतली असून त्यांच्या रूपाने शेतकरी प्रश्नांवर लढणारा एक लढाऊ कार्यकर्ता जिल्ह्याला मिळाला आहे.
हेही वाचा… पंकज गोरे : रांगड्या शिवसेनेत उच्चविद्याविभूषित आणि कार्यमग्न कार्यकर्ता
तासगाव, यशवंत, महांकाली, माणगंगा या कारखान्यांनी कोट्यवधीची देयके ऊस उत्पादकांची थकित ठेवली होती. न्यायालयीन लढा दीर्घ काळ चालणारा आणि कारखानदार शासन व्यवस्थेवर अंकुश ठेवणारे यामुळे हक्काच्या प्रश्नासाठी चटणी भाकर हाती घेऊन हक्काच्या पैशाची वसुली करण्यासाठी खराडे यांनी संघर्ष केला. या लढ्यामुळेच ऊस उत्पादकांना हक्काचे पैसे मिळाले. द्राक्ष व्यापारी लाखो रुपयांना दरवर्षी टोप्या घालतात, त्यांना शोधून कायद्याच्या कचाट्यात अडकविण्याचेही त्यांचे प्रयत्न व्यापारी वर्गावर दबाव टाकण्यात मोलाचे ठरले.
हेही वाचा… देवानंद पवार : शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता
शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न व्यवस्थेशी सातत्याने संघर्ष करून सुटतीलच असे नाही, तर व्यवस्थेत गेले तर या प्रश्नांची निदान चर्चा घडवून आणण्यात यश येईल ही भावना आहे. यातूनच सत्तेमध्ये नसले तरी ज्या व्यासपीठावर या प्रश्नांची सोडवणूक करता येईल असे सत्तेचे व्यासपीठ मिळाले तर हवेच आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला छातीवर घेऊन संघर्ष हाच मूलाधार मानून काम करीत असलेला खराडे कोणताही राजकीय वारसा नसताना चळवळीच्या माध्यमातून भूमिपुत्रांसाठी, बापजाद्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेल्या महेश खराडे यांच्याकडे भविष्यातील राजकीय नेतृत्व म्हणून जिल्ह्यात पाहिले जात आहे.