काँग्रेस अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, तटस्थ असलेल्या सोनिया गांधी यांनी खरगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्यानंतर ‘जी-२३’सह देशभरातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी खरगे यांना पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा – राजस्थान : काँग्रेसच्या अंतर्गत वादामध्ये भाजपाची उडी; ९० आमदारांचे राजीनामे प्रलंबित ठेवल्याचं म्हणत कोर्टात मागणार दाद?

काँग्रेस अध्यक्षपदासाठी इच्छूक असलेले मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी उदमेदवारी अर्ज घेतल्यानंतर अखेर या निवडणुकीतून माघार घेतली. दिग्विजय सिंग यांनी मल्लिकार्जून खरगे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, केरळ, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, बिहार, राजस्थान, झारखंड, गृहराज्य कर्नाटक आणि पुद्दुचेरी येथील ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदारांनीही खरगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजस्थानमधील राजकीय अस्थिरतेनंतर निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांनी खरगे यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच राजस्थानचे प्रभारी अजय माकन आणि महाराष्ट्रातील दलित नेते मुकुल वासनिक यांनीही खरगे यांचे समर्थन केले आहे.

यासोबतच भूपिंदरसिंग हुडा, व्ही. नारायणसामी, पृथ्वीराज चौहान, ज्येष्ठ नेते एके अँटोनी, अंबिका सोनी, आनंद शर्मा, अभिषेक सिंघवी, तारिक अन्वर, सलमान खुर्शीद, प्रमोद तिवारी, ताराचंद भगोरा, कमलेश्वर पटेल, पीएल पुनिया, मूलचंद मीना, रघुवीर सिंग, मीना, अविनाश पांडे आणि विनित पुनिया यांनीही खरगे यांना पाठिंबा दिला आहे. तसेच राज्यसभा खासदार राजीव शुक्ला, सय्यद नसीर हुसेन, धीरज प्रसाद साहू, अखिलेश पीडी सिंह, मध्य प्रदेशचे आमदार दिलीप गुर्जर, उत्तर प्रदेशचे आमदार संजय कपूर, तसेच लोकनेते दीपेंद्र एस हुड्डा, व्ही वैल्थिलिंगम आणि मनीष तिवारी हे खासदारही मल्लिकार्जून खरगे यांच्या पाठिशी आहेत.

हेही वाचा – सेवा पंधरवड्यातही पुण्यात गतिमान कारभार उणेच; लालफितीचा कारभारच पुणेकरांच्या नशिबी! 

यापैकी मनीष तिवारी, पृथ्वीराज चौहान, आनंद शर्मा आदी नेते हे जी-२३ गटाचे सदस्य आहे. यांनीच २०२० मध्ये सोनिया गांधी यांना पत्र लिहीत पक्षात मोठे फेरबदल करण्याची मागणी केली होती. महत्त्वाचे म्हणजे शशि थरूर हे देखील या गटाचे सदस्य आहेत.

दरम्यान, थरूर यांनी समर्थनाबाबत बोलताना, ”आम्ही देशभरात स्वाक्षरी मोहीम राबवत असून किर्ती चिदंबरम, प्रद्यूत बोरोडोलोई आणि मोहम्मद जावेद या खासदारांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली” असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader