फडणवीस सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भातला प्रतिनिधित्व देताना भाजपकडून गडकरी -फडणवीस समर्थकांमध्ये समन्वय साधला जाईल की एका गटाला झुकते माप दिले जाईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.२०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात गडकरी गटाचा वरचष्मा होता. नंतरच्या विस्तारात फडणवीस समर्थकांची संख्या अधिक होती. हे उल्लेखनीय.शिंदे – फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पुढील आठवड्यात अपेक्षित आहे.

राज्यातील काँग्रेसचा पाय अधिक खोलात 

भाजपच्या वाट्याला येणा-या मंत्री पदातून  राज्यातील सर्व विभाग,पक्षातील विविध गट यांना प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे.  हा समन्वय साधताना पक्ष नेतृत्वाची कसोटी लागण्याची शक्यता आहे. विशेषत: विदर्भात हा मुद्दा अधिक महत्वाचा आहे. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही प्रमुख नेते विदर्भातील असून त्यांच्या समर्थक आमदारांची संख्या अधिक आहे.२०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात विदर्भातील चार राज्य मंत्र्यांसह आठ मंत्री होते.यात सुधीर मुनगंटीवार ( चंद्रपूर), चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर), राजकुमार बडोले ( भंडारा), भाऊसाहेब फुंडकर ( अकोला) या कॅबिनेट मंत्र्यांसह रणजित पाटील ( अकोला) प्रवीण पोटे ( अमरावती) अंबरिश आत्राम ( गडचिरोली) आदी गडकरी समर्थकांचा समावेश होता.

पाहा व्हिडीओ –

हिंदुत्वाच्या भूमिकेबरोबरच बंडखाेरीमागे ‘मातोश्री’ मधील वर्तन बदलाचेही कारण

मधल्या काळात भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनामुळे त्याची मंत्रीपदाची जागा रिक्त झाली होती.ती भरण्याच्या हेतूने सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करताना फडणवीस यांनी  बडोले, आत्राम,पोटे या गडकरी समर्थकांना वगळून परिणय फुके ( भंडारा), संजय कुटे( बुलढाणा) आणि डॉ. अनिल बोंडे ( अमरावती) या आपल्या समर्थक आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता. आता शिंदे – भाजप सरकारमध्ये अशाच प्रकारे संतुलन राखले जाईल की फडणवीस यांच्या गटाला झुकते माप दिले जाईल हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.दरम्यान या संदर्भात भाजप प्रवक्ते गिरीश व्यास यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षात सर्व निर्णय सहमतीने होतात,असे स्पष्ट केले.

Story img Loader