निवडणुकांच्या काळात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सभा, मेळावे गरजेचे असते. यातील नेत्यांची आवेशपूर्ण भाषणे अनेकदा कार्यकर्त्यांमध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण करणारी आणि निवडणुकीचे निकालही फिरवणारी ठरतात. त्यामुळेच मेळावे महत्वाचे ठरतात. निवडणूक राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्याला काँग्रेसला ही बाब कळू नये, असे निश्चित नाही. पण तरीही या पक्षाचे नेते मेळावे आयोजित करून त्याकडे पाठ फिरवत असेल तर त्याचे चुकीचे संदेश कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात जातात. रविवारी नागपुरातील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात घटक पक्षांसह काँग्रेसच्याही प्रमुख नेत्यांनी फिरवलेली पाठ त्यांच्यात निवडणुकीविषयी गांभीर्य नसल्याचे स्पष्ट करणारी ठरली.
नागपूर शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्या प्रचारार्थ रविवारी मेळावा पार पडला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल, खासदार बाळू धानोरकर, माजी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मात्र काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार व मेळाव्याच्या शेवटी आलेले विजय वड्डेटीवर यांचा अपवाद सोडला तर नाना पटोले, प्रपुल्ल पटेल यांच्यासह शिवसेनेचा एकही प्रमुख नेता मेळाव्याला हजर नव्हते.
हेही वाचा… मुंबईत रामदास आठवले की प्रकाश आंबेडकर कोणाची अधिक ताकद ?
मुळात नागपूरच्या जागा काँग्रेसने खेचून आणली. त्यामुळे या जागेवर मेहनत घेऊन त्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी ही आघाडीतील इतर पक्षाच्या तुलनेत काँग्रेसची अधिक आहे. मात्र पक्षाचे नेते दोन गटात विभागले गेले. एक गट पक्षाने पाठिंबा दिलेल्या उमेदवारासोबत तर दुसरा गट दुसऱ्या एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात गुंतला आहे. राष्ट्रवादीने प्रचारातूनत अंग काढून घेतले, उलट त्यांचा बंडखोर रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज भरूनही ऐनवेळी माघार घ्यायला लावल्याने शिवसेनाही नाराज आहे आणि प्रचारापासून अलिप्त आहे. यापाश्वभूमीवर रविवारचा मेळावा महत्वाचा होता.
हेही वाचा… सत्तांतरानंतरही भुसे-हिरे संघर्ष सुरूच
सात दिवसावर निवडणूक आली असताना काँग्रेस व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाना हा मेळावा दणक्यात घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवारांपर्यत एक जोसकस संदेश देता आला असता. पण काँग्रेसने ही संधी गमावली. प्रदेशाध्यक्षच आले नाही. त्यांनी त्यांनी दूरध्वनीवरून कार्यकर्त्यांना संबोधित केले. ही बाब अनेकांना खटकली. त्यामुळेच काँग्रेस नेते सुनील केदार यांनी त्यांच्या भाषणात जाहीरपणे संघटना मजबुतीचे महत्व सांगताना हे असेच सुरू राहिले तर पक्ष केवळ निवडणुकीच्या काळात लावण्यात येणाऱ्या पोस्टर पुरता मर्यादित राहील, असे खडे बोल सुनावले.
एकूणच चित्र नागपूरच्या जागेच्या संदर्भात महाविकास आघाडीत व विशेषत: काँग्रेसमध्ये ताळमेळ नसल्याचेच दिसून येत आहे.