नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरापासून सुरू झालेल्या पक्ष बदलण्याची परंपरा नांदेडमध्ये अजूनही कायम आहे. माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह सुमारे अर्धा डझन नेते, पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी आ. प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. ही मंडळी छ. संभाजीनगर येथे होऊ घातलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
नांदेडच्या राजकारणात ‘मिशन विरोधक फोड’ सुरु असून त्यासाठी अशोक चव्हाण-चिखलीकरांत चढाओढ लागली आहे. ‘पत्ते पे पत्ता’ ही मालिका जणू सुरु असल्याचे दिसून येते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून काँग्रेस तसेच अन्य पक्षातील जुन्या जाणत्यांसह युवक पुढारी, कार्यकर्ते भाजपात प्रवेश करण्याचा सिलसिला सुरुच आहे. गावपातळीवर घट्ट मुळं असलेल्या सरपंच मंडळींवर खा. चव्हाण यांनी लक्ष्य केले आहे. त्या पाठोपाठ ‘हम भी कुछ कम नही’ असा दावा करीत आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कक्षा वाढविण्याचा सपाटा लावला आहे.
हे ही वाचा… अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
मागील आठवड्यात माजी आमदार अविनाश घाटे, भाजपातून काढून टाकलेले लोकसभा प्रमुख व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या हाती घड्याळ बांधल्यानंतर आता आणखी काही मंडळी राष्ट्रवादीच्या वाटेवर दिसून येतात. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातून काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार व माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय भाजपातून बंडखोरी केलेले जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, अॅड. मुक्तेश्वर धोंडगे, मनपाचे माजी उपमहापौर सरजितसिंघ गिल, माजी सभापती अशोक पाटील मुगावकर यांनीही अजितदादा पवार यांची आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.