हर्षद कशाळकर
अलिबाग : रायगड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले आणि खालापूर आमदार महेंद्र थोरवे हे दोन्ही आमदार घरच्या मैदानावर चितपट झाले आहेत. तर अलिबाग मध्ये शेकापच्या जयंत पाटलांना धक्का बसला.
हेही वाचा… पराभवाच्या भीतीने अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत माघारीची भाजपवर नामुष्की….
जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीच्या ११६ जागांसाठी निवडणूक पार पडली. सरपंचपदासाठी ३६ तर सदस्यपदासाठी २१६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते. सोमवारी सकाळी या सर्व ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी प्रक्रीया शांततेत पार पडली. यावेळी प्रस्थापितांना मतदारांनी धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. १६ पैकी ५ ग्रामपंचायती महाविकास आघाडीने जिंकल्या. शिवसेनेच्या शिंदे गटाने ४, भाजपने २ तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने १ , शेकापने १ तर स्थानिक आघाड्यांनी ३ ग्रामपंचायती जिंकल्या. अलिबाग तालुक्यातील नवगाव आणि वेश्वी ग्रामपंचायतीत शेकापला शिवसेना शिंदे गट प्रणित महाआघाडीने धक्का दिला. दोन्ही ग्रामपंचायतीत शेकापचे सरपंचपदाचे उमेदवार पराभूत झाले. विशेष म्हणजे आमदार जयंत पाटील यांचे वास्तव्य असलेल्या वेश्वी ग्रामपंचायतीत शेकापला पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षांतर्गत बंडखोरी शेकापला भोवली. दोन्ही ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार पराभूत झाले असले तरी शेकापचे सदस्य जास्त निवडून आले.
हेही वाचा… आमदार अनिल बाबर यांनी काढले गोपीचंद पडळकर यांचे ‘संस्कार’!
महाड तालुक्यात शिंदे गटाचे पक्ष प्रतोद असलेल्या आमदार भरत गोगावले यांना महाविकास आघाडीने धक्का दिला. काळीज खरवली ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरपंच चैतन्य म्हामूणकर निवडून आले. दहा सदस्य निवडून येऊनही गोगावले यांची या पराभवामुळे चांगलीच कोंडी झाली. पोलादपूर मधील तीन ग्रामपंचायती मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाने जिंकल्या. तर चौथी ग्रामपंचात मनसे प्रणित आघाडीने ताब्यात घेतली.
हेही वाचा… साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?
माणगावमधील तीन ग्रामपंचायतीपैकी एक ग्रामपंचायत शिवसेना ठाकरे गटाने, १ ग्रामपंचायत शिवसेना शिंदे गटाने तर एक शेकापने राखली. खालापूर तालुक्यात महाविकास आघाडीची सरशी झाली. आमदार महेंद्र थोरवे यांना आघाडीने चितपट केले. चौक, आसरे आणि लोधीवली या तीन ग्रामपंचायती शिवसेना ठाकरे गट प्रणित महाविकास आघाडीने राखल्या. तर तुपगाव ग्रामपंचात भाजपने जिंकली. याशिवाय पनवेलमधील खैरणे ही ग्रामपंचायत भाजपने शेकापकडून खेचून घेतली. एकूणच मतदारांनी या निवडणुकीत प्रस्तापितांना धक्के दिल्याचे पाहायला मिळाले.